मुंबईची लाईफलाईन बंद, रस्ते वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

अनिश पाटील
Tuesday, 13 October 2020

मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते वाहुकीवरील ताण आणखी वाढला आहे.

मुंबईः कोरोना संकटात लॉकडाऊन केल्यानंतर पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील बऱ्यापैकी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते वाहुकीवरील ताण आणखी वाढला आहे. मुंबईतील रस्त्यावर विशेष करून पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत.  सकाळच्या वेळेला मुंबईत येणाऱ्या मार्गिकांवर, तर सायंकाळी मुंबई बाहेर जाणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडीने उग्ररुप धारण केले आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा घेतलेला आढावा.

दहिसर टोल नाका

पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडला आहेत. उत्तर वाहिनीवर सांताक्रुझपर्यंत कशीतरी गाडी पोहोचली की त्यानंतर अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होते. त्यामुळे दादरपासून दहिसर गाठयला किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. सीएसटीकडून मीरा रोड, भाईंदर, विरारला जाणाऱ्या नागरिकांचा संपूर्ण दिवस वाहतुकीत जात आहे. गोरेगाव, बोरीवली आणि दहिसर टोल नाका परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी वाहतुक दुसऱ्या मार्गिकांवरून वळण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी बॉटलनेक झाल्याचे दिसून येत आहे. गिरीश सावंत यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे दहिसर परिसरातील भाडी नाकारली जातात. बसही अडकून पडत असल्यामुळे परिसरातून वाहतूक करणे खूप कठीण झाले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर

प्रिन्स ऑफ सबर्ब अशी ओळख असलेल्या मुलुंड उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुलुंडच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर कार्यालयीन वेळांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. प्रामुख्याने आनंदनगर टोल नाक्यापासून म्हाडा कॉलनी जंक्शन पर्यंत वाहनांची दाट वर्दळ दिसून येते. तासनतास वाहनांना ताटकळत राहावे लागते. परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास मोठा विलंब होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना, म्हाडा कॉलनी सोसायटी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक म्हणाले, "मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उड्डाणपूलावरच्या वाहतूक कोंडीमुळे वरतून न जाता पूलाच्या खालून जातात. परिणामी आनंदनगर टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे दोन्ही दिशेला नेहमी वाहतूक कोंडी झालेली दिसते." याच मार्गाने नियमीत ऑफिसला जाणारे विजय प्रधान म्हणाले, "पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे ऑफिस गाठता गाठता दुपारची वेळ होते. दररोज प्रवासात 4-6 तास वाया जातात.

मानखुर्द

शीव-पनवेल महामार्ग, मानखुर्द- घाटकोपर जोडरस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी आता स्थानिकांच्या अंगवळणी पडली आहे. शीव-पनवेल महामार्गावर मेट्रो रेल्वे तर घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यांवर मुख्यत्वे वाहतूक कोंडी होते त्याला रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या उभी करण्यात आलेली वाहने तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले गॅरेजमालक हातभार लावत असतात. शीव-पनवेल महामार्गावर मानखुर्द स्थानकासमोरील भुयारी मार्गाच्या पुलापासून मुंबईच्या दिशेला विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील एक लेन जवळ जवळ बंदच आहे. त्यामुळे याठिकाणी बहुतेकदा वाहतूक कोंडी होत असते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी जर या रस्त्यांवर एखाद्या वाहनात बिघाड झाला तर वाहतूक मंदावून प्रवासी रखडतात. महाराष्ट्र नगर टी जंक्शन येथे घाटकोपर तसेच नवी मुंबई कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेतच त्यात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूकीचे तीन तेरा वाजतात.

वरळी नाका

30 जून 2009 ला लोकार्पण करण्यात आलेल्या सागरी सेतूच्या सर्व मार्गिका 24 मार्च, 2010 ला सुरू झाल्या. सध्या या सागरी सेतूतून सरासरी 37 हजार 500 गाड्या प्रतिदिन ये-जा करतात. त्यातील बहुतांश गाड्या या खान अब्दुल गफार खान मार्ग, अॅनी बेझंट रोड आणि डॉ. आर.जी. थडानी या मार्गांचा वापर करतात. 2010 पूर्वी खान अब्दुल गफार खान मार्ग, थडानी मार्ग या मार्गांवर केवळ दोन हजार ते तीन हजार गाड्या प्रतिदिन धावायच्या. त्याचे प्रमाण वाढून 30 हजारांच्या वर गेले आहे. विशेष करून वरळी डेअरी कार्यालयापासून जगन्नाथ कुलकर्णी चौकापर्यंत हा मार्गाची रुंदी थोडी कमी आहे. परिणामी, सकाळ दक्षिण वाहिनीवर आणि संध्याकाळी उत्तर वाहिनीवर वाहनांची काही प्रमाणात कोंडी होते. याशिवाय वरळी डेअरी जवळील रस्त्यावर वाहनांची पार्किंग ही वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड

पावणे सात किलोमीटरचा हा मार्ग पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी बांधण्यात आला.  लिंक रोड बांधताना अनेक अडचणी आल्या होत्या. पण 2014 हा मार्ग सुरू झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व महानगरातील ये-जा ही अर्ध्या तासाने कमी होण्याची अपेक्षा होती. पण कुर्ला पश्चिम येथे निर्माण होणा-या बॉटल नेकमुळे या मार्गिकेचा वापर करणे वाहन चालक टाळतात. त्यामुळे एप्रिल महिन्यात महापालिकेच्या वतीने येथील सीएसटी मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. लिंकरोडचा साडे तीन किलोमीटरचा पहिला टप्पा हा घाटकोपर आणि कुर्लापर्यंत पोहोचण्यासाठी वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेष करून सकाळ आणि संध्याकाळी ही वाहतूक संथगतीने चालते. याशिवाय रस्त्या शेजारच्या झोपड्याही विशेष डोकेदुखी ठरत होत्या. या झोपड्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. त्याचाही वाहतुकीवर परिणाम होतो. 

उस्मान शेठ राखांगी चौक, लोअर परळ

लोअर परळचा पुल वातुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच अॅनी बेझंट मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे राखांगीची चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला 50 हजारांच्या आसपास गाड्यांची वाहतूक होते. त्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. याबाजूला फिनीक्स मॉलपासून ही कोंडी पार सातरस्त्यापर्यंत होते. त्यामुळे दोन किलोमीटरचा हा परिसर पार करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. 

एल्फिन्स्टन जंक्शन(प्रभादेवी स्थानक)

लोअर परळ येथील पुल वातुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे एल्फिन्स्टन चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. तुलनेने त्यात वाहतुक पोलिसांच्या प्रयत्नामुळे बरीच सुधारणा झाली असली,  या परिसरात महत्त्वाची रुग्णालये असल्यामुळे वाहतूक कोडींचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे.

पेडर रोड हाजीअली

दक्षिण मुंबईत असलेली महत्त्वाची ठिकाणी आणि सरकारी कार्यालयामुळे हाजीअली पासून पेडर रोडवर प्रचंड वाहतुक कोंडी होते. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळी या मार्गिकेवरून जाण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. त्यात तेथे डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे मार्गिका बंद असल्यामुळे ताडदेव येथील वाहतुकीवर विशेष परिणाम होत आहे. 
 
वाडीबंदर

फ्री वेमुळे नवी मुंबईला जाण्याचा मार्ग सुखकर झाला असला, तरी वाडीबंदर येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. या मार्गावरून सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला 40 हजारांहून अधिक वाहने धावतात. त्यामुळे वाडीबंदर चौकावर काही प्रमाणात वाहतूक प्रभावीत होते. सायंकाळी डॉकयार्डपासून वाडीबंदरपर्यंत गाड्यांची लांबच लांब रांग पहायला मिळते.  

वांद्रे सी लिंक

सीलिंकवरून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांमुळे वांद्रे येतेही प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला या मार्गिकेवर 20 हजारांहून अधिक वाहने धावतात. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर जाणारा रस्ता आणि वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे वाहतूक कोंडी होते.
 
जुहू तारा रोड

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड(जेव्हीएलआर), जुहू तारा रोड, जुहू सर्कल, अंधेरी फडके पुल येथेही प्रचंड वाहतुक कोंडी होते. मुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहने येत असल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीवर होत आहे.

वाहनचालकांना टोल वाढीचा मोठा फटका

प्रथम लॉकडाऊन, त्यातून निर्माण झालेली आर्थिक चणचण आणि आता टोल वाढीमुळे प्रवाशांवर हालाकीची परिस्थिती आली आहे. गुरुवार, 1 ऑक्टोबरपासून राज्य सरकारने टोल फी 5 रूपये वरुन 25/- रूपये पर्यंत केली आहे. कारसाठी एकेरी मार्गातील टोल आता 35-40 रुपये मोजावे लागतात. 

भाडेवाढ झाल्यावर वाहन चालिका दिप्ती सावंत म्हणाल्या, "कोरोना व्हायरसमुळेच लोक आपले काम पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. या वरती, टोलमधील वाढ ही जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.  मुख्य त्रास म्हणजे सकाळच्या वेळेस ऑफिसला जाणाऱ्यांना मुलुंड ते मुंबईकडे पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाताना काही तास तरी थांबावे लागते. सरकारने या गंभीर बाबीमध्ये त्वरीत लक्ष घालावे.

मालाड

मालाड ते मालवणी अवघ्या 3 किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी  लागतात तब्बल 45 ते 50 मिनिटं माणूस चर्चगेटहून ट्रेनने अवघ्या 45 मिनिटात मालाडला पोहचतो मात्र मालाडहुन बस किंवा, रिक्षा चा प्रवास थकवणारा असतो. त्याला अनेक कारण आहेत.  एसव्ही रोड मार्वे रोड वर वाहतूक कोंडी तसेच मार्वे रोड आणि मीठ चौकी येथे  लिंक रोड जंकशन येथे वाहतूक कोंडी मुळे मार्वे रोड वर वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. तसेच गोरेगावच्या दिशेने लिंक रोडवरून दहिसर च्या दिशेला जाणाऱ्या वाहनांची मेट्रोचे काम सुरू असल्याने चिंचोली सिग्नल,गोरेगाव स्पोर्ट्स क्लब, डी मार्ट ते काच पाडा सिग्नल पर्यंत कोंडी होते तसेच वाहनांची रांग लागत थेट मार्वे रोड मीठ चौकी सिग्नलपर्यंत पोहचते. त्यामुळे  याचा परिणाम लिंक रोड वरून दहिसर च्या दिशेने जाणाऱ्याची आणि मार्वे रोड वरून मालवणी, मार्वे, मढ जाणाऱ्याचे हाल होतात.

चाकरमान्यांना कामावर 8/9तास  काम करावं लागतं. मात्र  वाहतूक कोंडीमुळे दररोज 4/5 तास प्रवासात वाया जातात. तसेच वाहतूक कोंडीमुळे लाखोंचा इंधन वाया जातो आणि पर्यावरणाचा ह्रास ही होतो. तसेच वाहन चालक सतत हॉर्न वाजवतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होतो.
 
शहीद अब्दुल हमीद रोड जंक्शन 

लिंक रोड वरील वाहतूक कोंडीचे ठिकाण,  चिंचोली सिग्नल, जीएस्सी सिग्नल, डिमार्ट समोर, काचपाडा सिग्नल तसेच लिंक रोड मार्वे रोड जंक्शन, विशेष माहिती: पश्चिम दूतगती मार्गावरून मालाड सबवे होत एसव्ही रोड हुन मार्वे रोड आणि पुढे मढ मार्वे रोड हा व्हीआयपी रस्ता आहे. मालाड पूर्वेत आर्मीचे ओरडीनंस केंद्र आहे. तसेच पश्चिमेत नेव्हीचे हमला येथे ट्रेनिंग सेन्टर आहे आणि पुढे मढ येथे एअर फोर्सचे केंद्र असल्याने  महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांची वावर सतत होत असते. त्यामुळे याला व्हीआयपी रोड म्हणून विशेष स्थान असून ही या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची आहे.

----------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai lifeline not yet open general public burden road transport increased


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai lifeline not yet open general public burden road transport increased