वन अधिकाऱ्यांची राष्ट्रीय उद्यानात दारू पार्टी

नेत्वा धुरी
बुधवार, 2 मे 2018

राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांच्या उपस्थितीत झालेल्या पार्टीचे फोटो एका अधिकाऱ्याने फेसबुकवर पोस्ट केले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हे फोटो काढून टाकले. या प्रकारामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षेविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावाजवळ पार्टीदरम्यान वनरक्षकाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच याच तलावाजवळ वन विभागाच्या बंगल्यात आजी-माजी वन अधिकाऱ्यांची दारू पार्टी रंगल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक आणि संचालक अन्वर अहमद यांच्या उपस्थितीत झालेल्या पार्टीचे फोटो एका अधिकाऱ्याने फेसबुकवर पोस्ट केले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हे फोटो काढून टाकले. या प्रकारामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षेविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा परिसर अतिसंरक्षित क्षेत्रात आहे. या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई आहे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करायची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली सुरू असल्याचे या प्रकारानंतर उघड झाले आहे. तुळशी तलावाजवळील "लॉगहट' या वन विभागाच्या अतिथिगृहात 12 मार्चला ही पार्टी झाली. या पार्टीचे फोटो राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी धीरज मिरजकर यांनी फेसबुकवर अपलोड केले होते. त्यामध्ये मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद, माजी सहायक वनसंरक्षक सतीश फाळे, सहायक वनसंरक्षक प्रशांत मसूरकर, वन क्षेत्रपाल संजय वाघमोडे, तुंगारेश्‍वर अभयारण्याचे वन क्षेत्रपाल तोंडे, कृष्णगिरी उपवनाचे माजी वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, उपवन संरक्षक दिनेश सिंह, लॉगहटचे वनरक्षक यांच्या नावाचा उल्लेख या फोटोसह केलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या भागात दारू पिण्यास मनाई असल्याचे लक्षात येताच फोटो काढून टाकण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai liquor party in sanjay gandhi national park