esakal | मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा बंद होणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा बंद होणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

मिनी लॉकडाउन करूनही अद्यापही रोज नव्या कोरोनाबाधितांचा उद्रेक

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा बंद होणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: गेले काही दिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागणार की नाही याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेरीस दिवसा जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू आणि शनिवार-रविवारी वीकेंड कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लोकल प्रवासाबाबत काय? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. पण आसनक्षमतेनुसार लोकल प्रवास सुरू राहणार असल्याचा दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आला. मिनी लॉकडाउन करून चार दिवस झाले असले तरी अद्याप कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबद्दल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.

मी ठाकरे सरकारला हात जोडून विनंती करतो की...- देवेंद्र फडणवीस

"लोकल सुरू करावी यासाठी आमच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला होता. अनेकांनी आमच्यावर टीका केली. आम्ही रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करायचो त्यावेळी ते आम्हाला वारंवार नकार देत होते. पण कामगार आणि चाकरमान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून आपण लोकल सुरू करण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला होता. पण सध्या रेल्वेमध्ये पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची संख्या वाढतेय. अशा परिस्थितीत लोकल बंद करावी की मागच्या वेळेप्रमाणे लोकल सेवेबाबत काही निर्बंध लागू करावेत, याबद्दल आमचा विचार सुरू आहे", असं महत्त्वपूर्ण वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं.

१५ दिवसांत आणखी २ मंत्र्यांचे राजीनामे; भाजपचा खळबळजनक दावा

मिनी लॉकडाउनची घोषणा होण्याआधी जेव्हा वडेट्टीवार यांना लोकलबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा त्यांनी लोकल रेल्वेसेवा बंद होणार नाही असं सांगितलं होतं. "लोकलसंदर्भात गेल्या वर्षी सरकारने निर्णय घेतला होता. त्यानुसार आपण आता विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला परवानगी दिली जाईल. आरोग्य विभाग, हॉटेल कर्मचारी, चाकरमानी यांचा यात समावेश असेल. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही उपाययोजना केली जाईल. लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर सरकारचा भर असेल”, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले होते. पण सध्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात न आल्यास पुन्हा एकदा लोकल प्रवासावर निर्बंध लावले जाऊ शकतात असं बोललं जात आहे.

loading image