esakal | Covid Update: मुंबईत गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Office

एकूण रूग्णसंख्येने ओलांडला ७ लाखांचा टप्पा

Covid Update: मुंबईत गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबईने कोरोना प्रसारावर लावलेला लगाम हादेखील त्यातील मोठा विषय आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत केवळ 1 हजार 362 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. पण महत्त्वाची बाब म्हणजे दिवसभरात मुंबईत 34 रुग्णांचा मृत्यू झाला. १३ एप्रिलपासूनचा हा मुंबईतील मृतांचा सर्वात कमी आकडा आहे. या 34 जणांसह मुंबईतील मृत्यूंचा आकडा 14 हजार 742 वर पोहोचला आहे. (Mumbai logs lowest death count since April 13 at 34 Covid 19 caseload tops 7 lakh mark)

कोविड रूग्णवाढीचा दर थंडावला असून सध्या हा दर 0.19 टक्क्यांवर स्थिरावला आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रूग्णांचा आकडा वाढला. मंगळवारी दिवसभरात 1 हजार 37 रुग्ण आढळले होते. बुधवारी त्यापेक्षा 325 रूग्ण जास्त आढळले. दिवसभरात आढळलेल्या 1, हजार 362 रुग्णांमुळे मुंबईने सात लाखांचा टप्पा ओलांडला. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 1 हजार 266 एवढा झाला आहे.

दरम्यान, दिवसभरात 1 हजार 21 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनाला हरवले. त्यामुळे मुंबईत सध्या 27 हजार 943 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट वाढून 94 टक्क्यांवर पोहोचला आहे तर रूग्णदुपटीचा कालावधी 348 दिवसांवर पोहोचला आहे.