
मुंबईची शान असलेला मरीन ड्राईव्ह झाला १०६ वर्षांचा
मुंबई : मुंबईची शान असलेल्या मरीन ड्राईव्हला नुकतीच १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १८ डिसेंबर १९१५ मध्ये ब्रिटिशांनी मरीन ड्राईव्ह ते नरिमन पॉईंट अशा मोठ्या पट्ट्यात भराव घालण्याच्या कामाला सुरुवात केली होती. या कामाला पाच वर्षे लागली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह आणि आसपासच्या आर्ट डेको इमारतींनी मुंबईचे सौंदर्य अधिक खुलवले. मरीन ड्राईव्ह आणि या परिसराने आजही आपले सौंदर्य टिकून ठेवले असून मुंबईची ओळख पुसू दिली नाही.(Marine Drive and its surroundings still retain their beauty and have not lost sight of Mumbai)
हेही वाचा: कोल्हापूर : ‘ॲट्रॉसिटी’तील पीडितांना तत्काळ पेन्शन
क्वीन्स नेकलेस म्हणजेच राणीचा हार अशी उपाधी लाभलेल्या मरीन ड्राईव्हला यापूर्वी केनेडी रोड असे म्हटले जायचे. आज या रस्त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे नाव दिले आहे. दमट हवेमुळे ईस्ट इंडिया कंपनीतील अधिकाऱ्यांची घुसमट होत होती. मोकळ्या हवेत फेरफटका मारता यावा, यासाठी त्यांनी मरीन ड्राइव्हची कल्पना केली. त्यानंतर प्रत्यक्षात ४४० एकर जमिनीवर भराव टाकून बांधकाम केले गेले. मरीन ड्राइव्हची लांबी सुमारे ४.३ किमी लांब आहे. त्यावर चालण्याची किंवा त्याच्या बाजूने प्रवास करण्याची मजा काही औरच आहे.
मरीन ड्राईव्हच्या निर्मिती वर्षाबाबत थोडीशी मतमतांतरे आहेत. मरीन ड्राईव्हच्या अगोदर ओव्हल मैदान बनले. त्याचे काम १९३५ पर्यंत सुरू होते, असे नरिमन पॉइंट चर्चगेट मरीन ड्राईव्ह सिटीजन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल कुमार यांनी सांगितले. मरीन ड्राईव्हचा भराव सुरू होता म्हणजे त्याचे प्रत्यक्ष बांधकाम त्यानंतर झाले असावे, असा त्यांचा अंदाज आहे. शिवाय मरीन ड्राईव्हवरील शेवटच्या ५ ते ६ इमारतींचे बांधकाम १९३९ ते १९४८ पर्यंत सुरू होते. त्याच दरम्यान मरीन ड्राईव्हचे बांधकाम पूर्ण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.(Oval became the ground before Marine Drive)
हेही वाचा: पुणे : सिंहगडावर रस्ता चुकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी शोधले
‘आर्ट डेको’मुळे सौंदर्य खुलले
मरीन ड्राईव्हलगत असलेल्या आर्ट डेको शैलीच्या इमारती हेदेखील मरीन ड्राईव्हचे खास वैशिष्ट्य आहे. येथील आसपास दिसत असणाऱ्या आर्ट डेको प्रकारच्या इमारती १९३० नंतर अस्तित्वात आल्या. मरीन ड्राइव्हच्या सभोवताली असलेल्या आर्ट डेको इमारतीमुळे मरीन ड्राईव्हच्या सौंदर्यात अधिकच भर पडली, असेही अतुल कुमार म्हणाले.
बॉलीवूडमध्येही फॅड
अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांचे पावसातील चिंब भिजलेले प्रेमगीत ‘रिमझीम गिरे सावन’ या गाण्यासह अनेक चित्रपटात मरीन ड्राइव्हचे सौंदर्य अगदी
खुलून आले आहे.
ब्रिटिशकाळात रेल्वेसारखे प्रकल्प उभारण्याबरोबर काही बांधकामांसाठी भराव टाकण्याचा निर्णय झाला. त्या वेळी चार टप्प्यात हा भराव टाकला गेला. कामात अडथळा नको, यासाठी एक भिंत उभारली गेली. तीच नंतर मरीन ड्राईव्ह म्हणून पुढे आली. काही जिमखाने, सरकारी इमारतींचे बांधकाम हे त्याच भरावावर करण्यात आले आहे. सध्या ही वास्तू आणि इथल्या इमारतींना जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे.
- भरत गोठोसकर, अभ्यासक, मुंबई हेरिटेज वास्तू
Web Title: Mumbai Majestic Marine Drive Turns 106 Years Old
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..