
फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग वा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे.
मुंबई : वेगवान आणि रोकडरहित प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर मंगळवार, 26 जानेवारीपासून 100 टक्के फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी महामंडळाने 11 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप आणि एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला 5 टक्के कॅशबॅक सुविधा दिली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. फास्टॅगच्या 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाने असा निर्णय घेतला आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढवा घेण्यासाठी येथे क्लिक करा
26 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने सज्ज असतील. दोन्ही मार्गांच्या पथकर नाक्यांवर उद्यापासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही मार्गिकांवर संमिश्र वाहने सोडली जातील. अशा मार्गिकांमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रकमेचा भरणा करू शकतील. मात्र, त्यांना पथकर नाक्याजवळील सुविधा केंद्रावरून फास्टॅग विकत घेऊन गाडीवर चिटकवावा लागणार आहे, असे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले. फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग वा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे.
mumbai marathi news 100 percent fastag from republic day 2021 Implementation on sea link and Mumbai Pune Expressway
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )