रिलायन्सची गॅसची पाईपलाईन उखडून टाकू! कर्जतमधील शेतकऱ्यांचा निर्धार

संतोष पेरणे
Saturday, 23 January 2021

येत्या 26 जानेवारी 2021 रोजी येथील गॅस पाईपलाईन उखडून टाकत उद्रेक आंदोलन करणार असल्याचे या शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. 

नेरळ  : गुजरात येथील दहेजपासून रायगडमधील नागोठणेपर्यंत रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन टाकली आहे. कर्जत तालुक्‍यातील दहा गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबादला अद्यापही मिळालेला नसल्याचे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत उपोषण, धरणे आंदोलने करूनही याकडे गांभीर्याने न बघितल्यामुळे आता आरपारची लढाई सुरू करणार असल्याची घोषणा या शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी येत्या 26 जानेवारी 2021 रोजी येथील गॅस पाईपलाईन उखडून टाकत उद्रेक आंदोलन करणार असल्याचे या शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. 

कर्जत येथील कमल सेवा केंद्रात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. तालुक्‍यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, पिंपळोली, तळवडे, वाकस, नसरापूर, गणेगाव आणि चिंचवली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्या आहेत. मोबदल्यासाठी गेले वर्षभर आंदोलन केल्यानंतर काही शेतकऱ्यांना मोबदला म्हणून धनादेश देण्यात आले; मात्र तेदेखील वटले नसल्याचे या वेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच, काही शेतकऱ्यांना एकदाही मोबदला न देता शासनाच्या कागदोपत्री मात्र पैसे दिल्याचे दाखवण्यात आले, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता तालुक्‍यातील बिरडोळे येथे शेतकरी हे आंदोलन करणार असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तालुक्‍यातील राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. आंदोलनाच्या दिवशी पोलिसी बळाचा वापर झाला तरी शेतकरी मागे हटणार नाहीत, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. 

मुंबई, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या आदेशाकडेही दुर्लक्ष 
मोबदल्याबाबत सरकारकडून आतापर्यंत केवळ आश्‍वासन देण्यात आली. यासंदर्भात झालेल्या बैठकीला रिलायन्स कंपनीचे अधिकारी उपस्थितही राहिले नाहीत. शासनाचे अधिकारी म्हणून पांडुरंग मकदुम यांनी रिलायन्सला कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे लेखी पत्र दिले होते; मात्र शासनाने सांगूनदेखील कंपनीने मोबदला दिला नाही. त्यामुळे आता उग्र आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, रोहिदास राणे आणि रमेश कालेकर यांनी सांगितले. 
Farmers in Karjat warn Reliance Gas Company Compensation in raigad 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news Farmers in Karjat warn Reliance Gas Company Compensation in raigad