ड्रेस कोड नको, शिलाई भत्ता द्या!  ST कर्मचारी संघटनेची महामंडळाकडे मागणी

प्रशांत कांबळे
Saturday, 23 January 2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात तीन वर्षांपूर्वी बदल करण्यात आला; मात्र अद्यापही या गणवेशाला कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे.

मुंबई  ः एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात तीन वर्षांपूर्वी बदल करण्यात आला; मात्र अद्यापही या गणवेशाला कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. वाहतूक कर्मचाऱ्यांना खाकी तर यांत्रिकी कर्मचाऱ्यांना निळा कापड आणि शिलाई भत्ता एसटी महामंडळाने द्यावा, अशी मागणी राज्य एसटी कामगार संघटनेने केली आहे. 

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाई भत्ता दिला जात होता. त्याप्रमाणे महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांना त्यांच्या मापाप्रमाणे त्यांचा गणवेश स्वतंत्रपणे शिवता येत होता. मात्र, 2017 साली एका खासगी कंपनीकडून तयार गणवेश कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. मात्र, या गणवेशाचे वितरण करण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी या गणवेशाचा वापरच केला नाही. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत नुकतेच परिवहन मंत्री आणि एसटीची मान्यता प्राप्त राज्य कामगार संघटनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पूर्वीप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाई भत्ता देण्याची मागणी करण्यात आली. 

महिलांना रंगीबेरंगी पोशाख नको! 
एसटीच्या वाहतूक कर्मचाऱ्यांना यापूर्वी खाकी कापडाचा गणवेश होता. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला जात होता. मात्र, महिलांचा खाकी गणवेश बदलून त्यांना रंगीबेरंगी ड्रेस कोड दिल्याने महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

मेरी खाकी नही दुंगी! 
एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनी गणवेश धोरणाविरोधात मोहीम उभी केली आहे. खाकीच्या गणवेशातच एसटीच्या महिला कर्मचारी सुरक्षित असल्याने, "मेरी खाकी नही दुंगी' असा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे राज्य एसटी कामगार संघंटनेच्या महिला केंद्रीय संघटक शीला नाईकवाडे यांनी सांगितले.

mumbai marathi news No dress code, pay sewing allowance ST staff unions demand to the ST mahamandal

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai marathi news No dress code, pay sewing allowance ST staff unions demand to the ST mahamandal