शनिवारी उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकाच मंचावर, महापौरांनी दिलं कार्यक्रमाचं निमंत्रण

भारती बारस्कर
Tuesday, 19 January 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

मुंबईः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.

त्यानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्याकरिता आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. 

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी महापौरांनी सकाळी 9.45 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मलबारहिल येथील सागर बंगल्यावर जाऊन त्यांना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलिस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत.  २३ जानेवारीला करण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमानिमित्त जरी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.  

हेही वाचा- मुंबई पालिका आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु करणार  CBSEच्या दहा शाळा

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai mayor kishori pednekar meet mns raj thackeray programme Invitation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai mayor kishori pednekar meet mns raj thackeray programme Invitation