Mumbai : औषध खरेदीच्या माध्यमातून मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

Mumbai : औषध खरेदीच्या माध्यमातून मेडिकल चालकाची ऑनलाईन फसवणूक

डोंबिवली : मेडीकल स्टोअर्स मधून औषधे खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवत मेडीकल चालकाची तब्बल 51 हजाराला फसवणूक केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात आयुष्यमान मिश्रा व रोशन गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडकपाडा पोलिसांनी रोशन गुप्ता याला अटक केली असून आयुष्यमान याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात वेलनेस फॉरेवर मेडीकलची शाखा आहे. आयुष्यमान मिश्रा व रोशन गुप्ता यांनी या मेडीकलच्या गोदरेज हिल, खडकपाडा सर्कल, उल्हासनगर व अंबरनाथ या शाखेतून एकूण 51 हजार 720 रुपयांची औषधे खरेदी केली. या ऑर्डरची उल्हासनगर येथे राहणाऱ्या रोशन याने डिलव्हरी केली. तर उत्तर प्रदेश येथून आयुष्यमान याने ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासविले. मात्र मेडीकल चालकाच्या खात्यात पैसेच जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यासोबतच इतर शाखांमधूनही अशाच पद्धतीने ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेडिकल चालक आकाश प्रजापती याने खडकपाडा पोलिस ठाण्यात आयुष्यमान व रोशन याच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी चोवीस तासाच्या आत रोशन याला अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी आयुष्यमान हा उत्तर प्रदेश येथील असल्याचे लक्षात आल्याने त्याच्या शोधासाठी एक पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.