मुंबई : एमआयडीसी नाल्याला आलाय पुन्हा हिरवा रंग

नाल्यातील केमिकल मिश्रित पाण्याला उग्र दर्प, स्थानिक हैराण
Mumbai MIDC Nala dirt chemical mixed water garbage harm to citizen
Mumbai MIDC Nala dirt chemical mixed water garbage harm to citizensakal

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभाग फेज 2 मधील गणेशनगर परिसरातील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून हिरव्या रंगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जात आहे. सकाळ किंवा रात्रीच्या वेळेस हे पाणी कारखान्यांतून नाल्यात सोडले जात असून या पाण्याच्या उग्र दर्पाने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. राज्य शासनाने 156 रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने प्रशासन नारिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप रहिवासी करतात. कारखाने स्थलांतरीत होतील तेव्हा होतील परंतू तोपर्यंत तरी किमान या कारखान्यातील प्रदुषणावर, त्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायन मिश्रित पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाने औद्योगिक विभागातील 156 रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याप्रकरणी कारवाई शून्य असल्याने स्थानिकांना आजही या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या प्रदुषणामुळे शहरातील अंतर्गत नाल्यांना हिरवा, निळा, पांढरा, नारंगी असे अनेक रंग प्राप्त होऊन त्यांच्या उग्र दर्पामुळे डोळे चुरचुरणे, मळमळ, उलट्या यांसारखे त्रास कायम सतावत आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिसराची पाहणी करुन येथील समस्या जाणून घेतल्या आहेत, त्यानंतर राज्य शासनाने कारखाने स्थलांतराचा निर्णय घेतला असला तरी त्यावर अंमलबजावणी का केली जात नाही. रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचे निर्णय घेऊन केवळ नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे, प्रत्यक्ष कारवाई न करता राज्य शासन कारखानदारांना सूट दिली जात असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत. .

गेल्या दोन दिवसांपासून एमआयडीसी फेज 2 मधील नाल्यात कंपन्यातून रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. उघड उघड हे रसायनमिश्रित हिरवे पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून देखील याकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये ही आश्चर्याची बाब आहे. या पाण्याला उर्ग दर्प येत असून यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेस हा वास वाढत असल्याची तक्रार नागरिक करतात.

गेल्या तीन चार दिवसांपासून गणेशनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात घाणेरडा वास येत आहे. नाल्याची पहाणी केली असता येथील चेंबरमधून हिरवे पाणी येत असल्याचे दिसले. यापूर्वी देखील या नाल्याला रसायनमिश्रित पाण्यामुळे विविध रंग प्राप्त झालेले आहेत. नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासन अद्यापही गांर्भियाने का घेत नाही आहे? हा प्रश्न पडला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ या कारखान्यांवर कारवाई का करत नाही? ही कारवाई लवकरात लवकर करुन नागरिकांचे जीव वाचवावे अशी आमची शासनाकडे मागणी आहे.

- शशिकांत कोकाटे, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com