उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प होणार सादर, आशियातील सर्वात श्रीमंत मनपाच्या अर्थसंकल्पात काय आहे अपेक्षित ?

सुमित बागुल
Tuesday, 2 February 2021

गेलं आर्थिक वर्ष कोरोनामध्ये गेल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्नापेक्षा २५ टक्के महसूल मिळाला आहे. 

मुंबई : कालच देशाचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केला. एकीकडे कोरोना, कोरोनामुळे आलेली आर्थिक मंदी आणि या मंदीच्या सावटात सादर केला गेलेला कालचा अर्थसंकल्प.

आता देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे. कोरोनामुळे मुंबई महापालिकेचीही आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशात कोरोनामुळे मुंबईचं आर्थिक बजेटही आर्थिक मंदीच्या सावटात सादर केलं जाणार आहे.

कालच्या देशाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेवर कोणताही नवीन कर लादला गेला नाही. यामुळे सर्वसामान्यांकडून बजेटच स्वागत करण्यात आलं. उद्या सादर होणाऱ्या मुंबईच्या बजेटमध्ये कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुधारण्यासाठी  मुंबईकरांवर कोणता कर लादला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

गेलं आर्थिक वर्ष कोरोनामध्ये गेल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्नापेक्षा २५ टक्के महसूल मिळाला आहे. 

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय अपेक्षित ?

मुंबई महापालिकेकडे ७५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. येत्या काळात कोरोना निर्माण झालेली वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मुंबई महापालिकेला उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून काढावे लागणार आहेत.

कोविड काळामध्ये मुंबईकरांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. अशात मुंबईकरांवर मुंबई महानगरपालिका  नवीन कर लादणार का ? याकडे सर्वांचं लक्ष असेल. 

येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुका देखील असणार आहेत. त्यामुळे हाही मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन मुंबई महापालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. 

उद्या सादर होणारं बजेट हे मुंबईकरांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणारं बजेट असू शकतं. कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली तरीही तयार राहायचं असल्यास आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये चांगलीच वाढ होऊ शकते.  आरोग्य बजेटमध्ये १० टक्के वाढ अपेक्षित आहे.  

कोरोनामुळे मुंबईतील बंद असलेल्या शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. अशात ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी शिक्षण विभागाकडे मुंबई महापालिका विशेष लक्ष घालू शकतं. मुंबई महापालिकेच्या शाळा CBSE  किंवा ICSE बोर्डाच्या करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्याबाबत या बजेटमध्ये तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. 

रखडलेल्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते. यामध्ये कोस्टल रोड प्राधान्यक्रमांकावर असू शकतो. 

समुद्राचं पाणी गोड करण्यासाठीचा देखील प्रकल्प मुंबई महापालिकेकडून उभारला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी देखील चांगल्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. 

मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला महसूल प्राप्त होत असतो. अशात मुंबईकरांवरील या करांचा बोजा वाढणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आर्थिक निधीची तरतूद केली जाऊ शकते. 

mumbai news aisas richest municipal corporation BMC to present their budget for 2021


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news aisas richest municipal corporation BMC to present their budget for 2021