esakal | 'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

बोलून बातमी शोधा

'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई}
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - दीवार चित्रपटातील "कह दू तुम्हें' हे गीत आगामी बादशाहो चित्रपटात वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सुपर कॅसेट इंडस्ट्रीला नुकतीच अंतरिम मनाई केली.

बादशाहोमध्ये अजय देवगणने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमात दीवारमधील "कह दू तुम्हें' हे गाणे नव्याने दाखवण्यात येत आहे. मात्र, त्याचे हक्क आमच्याकडे आहेत आणि त्याचे शब्द किंवा चाल वापरण्यास कोणालाही परवानगी नाही, असा दावा त्रिमूर्ती फिल्म्सच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. त्यावर न्यायाधीश के. आर. श्रीराम यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली.

त्रिमूर्ती फिल्म्सने 1974 मध्ये गीतकार सुधीर लुधियानवी आणि संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याबरोबर या गीताबाबत करार केला आहे. याशिवाय, पॉलिडोर ऑफ इंडियाबरोबर गीताच्या ग्रामोफोन रेकॉर्ड तयार करण्याबाबतचाही करार केला आहे. गीत आणि त्याची चाल कोणालाही परवानगीशिवाय वापरता येणार नाही, असेही त्रिमूर्ती फिल्म्सने म्हटले आहे. या गीताचा वापर पॉलिडोरमार्फत करू शकतो, असा दावा "बादशाहो'च्या वतीने करण्यात आला आहे; मात्र पॉलिडोरबरोबर केलेल्या करारानुसार त्यांना फक्त गाणी ऐकण्यासाठी वापरण्याची मुभा मिळाली आहे, गाण्याचा वापर अन्यत्र करण्याची मुभा नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.