रुग्णालयातील "जेरिऍट्रिक विभाग' प्रभावी होण्याची गरज

रुग्णालयातील "जेरिऍट्रिक विभाग' प्रभावी होण्याची गरज

मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत.

सुधारलेले जीवनमान आणि वधारलेले आयुष्यमान यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या देशभरात वाढते आहे. येत्या दहा वर्षांत भारताच्या लोकसंख्येच्या दहा टक्के प्रमाण ज्येष्ठांचे असेल, असे मानले जाते. त्यामुळेच वाढत जाणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी काही उपाय केले जात आहेत. केंद्राने ज्येष्ठांसाठी जिल्हा आणि पालिका रुग्णालयात खास विभाग सुरू करण्याचे दिलेले आदेश हा त्याचाच एक भाग; पण अनेक ठिकाणी हे विभाग केवळ कागदावरच राहिले आहेत. काही रुग्णालयांत चौकशी केली असता, उपक्रम चांगला असला तरी तो तितक्‍या प्रभावीपणे राबवणे अद्यापही शक्‍य झाले नसल्याचे त्यातून दिसले.

ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या पाहता, या विभागात बदल व्हायला हवेत, असेच अनेकांचे म्हणणे दिसले. ओपीडीची वेळ वाढवण्याची मागणीही रुग्णांनी केली आहे. त्यासोबतच कुशल डॉक्‍टर आणि त्यांच्या विभागाशी निगडित आवश्‍यक कुशल कामगारांच्या संख्येत वाढ व्हायला हवी, ज्यामुळे सरकारी रुग्णालयात येणाऱ्या वृद्धांना एका वेळी एकाच छताखाली उपचार मिळतील, असेही अनेकांचे म्हणणे पडले.

मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर अशा प्रमुख रुग्णालयांत वृद्धांसाठी खास बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) घेण्यात येते. आठवड्यातून एकदा असलेल्या या ओपीडीमध्ये सुमारे 50 रुग्ण येतात, अशी माहिती पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. जेरिऍट्रिक ओपीडीमध्ये येणारे बऱ्याच रुग्णांना स्मृतीशी निगडित आजार असतात. जनरल ओपीडीमध्येही असे रुग्ण असतात, अशा रुग्णांना रुग्णालयात सुरू असलेल्या "मेमरी क्‍लिनिक'मध्ये उपचारांसाठी सहभागी करून घेण्यात येते. केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, मानसोपचार विभागाव्यतिरिक्त इतर विभागांनीही जेरिऍट्रिक विभागाला मदत होईल अशी जबाबदारी घेऊन संबंधित रुग्ण तिथे जातील, याची काळजी घेतली पाहिजे. या विभागात ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर असले पाहिजेत, असे मत नायर रुग्णालयाच्या जेरिऍट्रिक विभागाच्या डॉ. अल्का सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.
सुधारणांची गरज असली तरी दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उपाय केले जात आहेत, हे नक्कीच.

डिग्निटीने समस्या सोडवा!
ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाचे-शांततेचे असते असे वाटते; पण निवृत्तीनंतरही 75 वर्षांची बायको चारित्र्याचा संशय घेत असेल तर? एकाच घरात राहणारी मुले ज्येष्ठांशी वर्षानुवर्षे बोलत नसतील तर? डिग्निटी फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठांच्या अशा समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

अंधेरीत राहणारे 81 वर्षांचे हमीद (नाव बदलले आहे) यांची पत्नी तसेच दोन मुले यांचा गेली 25 वर्षे एकमेकांशी संवाद नव्हता. हमीद यांनी आपले गॅरेज मुलाला दिले; पण तरीही बापाने आपल्यासाठी काहीच केले नाही, असा त्याचा समज. पत्नी नेहमीच आपल्याला न पचणारे मसालेदार जेवण करते. रात्री पंखा बंद करते. तुसडेपणाने बोलते, असा हमीद यांचा आक्षेप. यावरून त्यांचे वाद होत. गेली 25 वर्षे हमीद हे एकटेपणाची समस्या उरात घेऊन वावरत होते. अखेर त्यांनी डिग्निटी फाऊंडेशनकडे दाद मागितली. डिग्निटीने घरातील सर्व व्यक्तींशी संवाद साधला. सर्व बाबी जाणून घेऊन एकमेकांच्या अपेक्षा सांगितल्या. सुदैवाने मोठे वाद नसल्याने सर्वांनी सूज्ञपणे ते ऐकले व त्या विखुरलेल्या कुटुंबाचा संवाद सुरू झाला. सर्वांचे वर्तन बदलल्याने आता सर्व काही छान चालले आहे, असे हमीद यांनीही डिग्निटीला कळवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com