कमला मिल दुर्घटना दोषींवर द्रुतगती न्यायालयात खटले चालवा - तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटना अतिशय गंभीर असून, ज्या पब आणि रेस्टॉरंटमधील निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे; परंतु या पब आणि रेस्टॉरंटला नियमांचे उल्लंघन करून बेकायदा परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई झाली पाहिजे. दोषींवर द्रुतगती न्यायालयात खटला चालवून यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि या दुर्घटनेत जीव गमाविलेल्या निष्पापांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

उच्चस्तरीय चौकशी करा - अशोक चव्हाण
कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. किड्या-मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचा आदेश देते, परंतु ठोस कारवाई होत नाही. कमला मिल कंपाउंडमधील अनेक क्‍लबमध्ये अनधिकृत बांधकामे असून, अनेकांना अग्निशमन विभागाच्या परवानग्या नसल्याचे किंवा नियम डावलून परवानग्या दिल्याची माहिती मिळाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्‍य नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्याची तक्रार
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 6 ऑक्‍टोबर 2017 रोजी कमला मिल कंपाउंडमधील हॉटेलबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. पालिका आणि पोलिस दोघे या घटनेसाठी जबाबदार असून, वेळोवेळी निरीक्षण न झाल्यामुळे दुर्दैवी घटना घडली असून, येथील लेआउट तपासता मालकांवरसुद्धा निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करावा, ही मागणी गलगली यांनी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news kamala mills fire criminal crime in court