लोकमान्य टिळक रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई - केईएमनंतर आता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी रुग्णालय पातळीवर तयारी सुरू आहे. अवयव प्रत्यारोपणाबाबत झालेल्या जनजागृतीमुळे टिळक रुग्णालयात यासंबंधी शस्त्रक्रियेची माहिती घेण्यासाठी अनेक रुग्ण येतात; मात्र या ठिकाणी यकृत प्रत्यारोपणाची सुविधा नसल्याने त्यांना अन्य रुग्णालयांत जावे लागते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुरू करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

रुग्णालयाच्या जठरात्र विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. आकाश शुक्‍ला यांनी नुकतीच जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. सरकारी रुग्णालयात हा खर्च सुमारे चार ते पाच लाख रुपये किंवा जास्तीत जास्त 10 लाख येतो. त्यामुळे टिळक रुग्णालयात ही सोय झाल्यास गरीब रुग्णांनाही दिलासा मिळेल.

अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले की, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. डॉक्‍टरही या शस्त्रक्रियेसाठी उत्सुक आहेत. यासाठी परवानगी मिळविणे आणि अन्य आवश्‍यक बाबींची जुळवाजुळव सुरू आहे. डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त पालिकेच्या केईएम रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची सुविधा आहे. या ठिकाणी 2010 पासून सुमारे 21 रुग्णांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत; तर जानेवारी 2018 पर्यंत या रुग्णालयात 51 जणांनी यकृत प्रत्यारोपणासाठी नोंद केली होती.

शस्त्रक्रियागृहासाठी रुग्णालयातच पर्याय
लोकमान्य टिळक रुग्णालयात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या परिस्थितीत रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रियागृह मिळण्याची अडचण आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरात असलेले शस्त्रक्रियागृह यकृत प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येईल असे समजते.

Web Title: mumbai news lokmanya tilak hospital Liver transplantation