
Mumbai News : झोपडपट्ट्यांना आगी कशा लागतात?
मालाड : मालाड पूर्वेतील आप्पापाडा झोपडपट्टीत सोमवारी लागलेल्या आगीची घटना ही महिन्याभरातील पाचवी घटना आहे. येथील झोपड्यांना नेहमी कशी काय आग लागते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अग्निशमन दलाला येथील आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
छोट-छोट्या गल्ल्यांमधून घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली. झोपडपट्टीतील आग विझवण्यासाठी प्रत्यक्ष पोहोचता येत नाही, तेथे आग विझवणारे गोळे किंवा ड्रोनचा वापर आधुनिक काळातही का होत नाही, केवळ गगनचुंबी इमारतींना आग लागल्यावरच त्यांचा वापर करायचा का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नव्याने सुरुवात...
कोकणातील राजापूर येथील २५ कुटुंबीय स्नेहा वेलफेअर सोसायटीत वास्तव्य करतात. त्यांचा भरलेला संसार अवघ्या काही मिनिटांत डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाला. येथील रहिवासी अनंत तुकाराम घाडी (वय ४६) हे दोन भावांसह येथे राहतात. आतापर्यंत केलेली सर्व जमापुंजी आगीत खाक झाली असून जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे ते सांगतात. घरातील सर्व साहित्यांसह कागदपत्रेही खाक झाली आहे. येथील प्रत्येक नागरिकांना आता पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
-अनंत तुकाराम घाडी
कसे जगायचे तुम्हीच सांगा?
जालना येथील विजय सातपुते हे बी.कॉम पदवीधर असून सध्या ते बेरोजगार आहेत. विजय सध्या नोकरीच्या शोधात असून आई-वडील बिगारीकाम करतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो; मात्र या आगीत घरात होते नव्हते, ते सर्व खाक झाले. त्यांच्या कुटुंबात नऊ लोक आहेत. काही क्षणांत चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता पुढे कसे जगायचे, असा सवाल त्यांना सतावत आहे.
-विजय सातपुते
दागिनेही गेले...
आदर्श चाळीतील शकुंतला दत्ता कोळी (वय ७०) या एकट्याच राहतात. आग भडकल्याने शेजाऱ्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांचा जीव वाचला तरी आयुष्याची जमापुंजी म्हणून जमवलेले सोन्याच्या दोन तोळ्यांच्या माळा, कानातील आणि अंगठी जळाले. तसेच आयुष्याची सर्व कमाई, कागदपत्रेही जळून राख झाल्याचे त्यांनी सांगितले.
-शकुंतला दत्ता कोळी