सुधाताई करमरकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - बालरंगभूमीचा पाया रचणाऱ्या, बालरंगभूमीला सशक्त दृष्टिकोन देणाऱ्या सुधाताई करमरकर (वय 83) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा आहे.

मुंबई - बालरंगभूमीचा पाया रचणाऱ्या, बालरंगभूमीला सशक्त दृष्टिकोन देणाऱ्या सुधाताई करमरकर (वय 83) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा आहे.

बालरंगभूमीचा भक्कम आधारस्तंभ आणि सशक्त असा पाया सुधा करमरकर यांनी घातला. परदेशातून शिक्षण घेऊन त्यांनी आपले सर्वस्व बालरंगभूमीला दिले. संपूर्ण भारतामध्ये बालरंगभूमीसाठी विविध प्रकारचे प्रयोग केले. तेवढ्याच व्यावसायिक पद्धतीने अत्यंत एक वेगळी प्रतिष्ठा या रंगभूमीला प्राप्त करून दिली. झी जीवनगौरव पुरस्काराने; तसेच प्रभाकर पणशीकर पुरस्काराने करमरकरांना गौरवण्यात आले आहे. अनेक पुरस्कारांनी करमरकर यांना गौरवण्यात आले आहे; मात्र गेली काही वर्षे त्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करणे अशक्‍य झाले होते. वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अनेक रंगकर्मींनी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विजय केंकरे, मधुरा वेलणकर, सुचित्रा बांदेकर, अशोक समेळ, रमेश भाटकर, विनय येडेकर, बालकलाकार देवेंद्र आजगावकर, लीला हडप, संजय क्षेमकल्याणी, अरुण काकडे मान्यवर उपस्थित होते.

बालनाट्य चळवळीच्या अध्वर्यू हरपल्या
"बाल रंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोमवारी श्रद्धांजली वाहिली.

शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की कुटुंबातूनच नाट्यसेवेचा वारसा घेऊन आलेल्या सुधाताई या क्षेत्राशी पूर्णत: समरस झाल्या होत्या. मराठी रंगभूमीने प्रारंभीच्या वाटचालीत दुर्लक्षित केलेल्या बालकांसाठीच्या स्वतंत्र रंगभूमीचा त्यांनी प्राधान्याने विचार केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी बाल रंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. बालनाट्य चळवळ रुजविण्यासाठी "लिटिल थिएटर' या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. या चळवळीच्या त्या खऱ्या अर्थाने अध्वर्यू होत्या. नाट्यलेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्वच भूमिका पार पाडताना त्या जणू आयुष्यभर रंगभूमीशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या होत्या. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्येसुद्धा त्यांनी अभिनय केला असून, अनेक कलावंतही घडवले आहेत.

बाल रंगभूमीचा एक अध्याय संपला - विनोद तावडे
अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या कार्यक्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या आणि मराठी बाल रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच्या निधनाने बाल रंगभूमीचा एक अध्याय संपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

तावडे म्हणाले 'ज्यांच्याशिवाय बाल रंगभूमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, त्या सुधा करमरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य बाल रंगभूमीसाठी खर्ची घातले. केवळ बालनाट्याला वाहिलेली स्वतंत्र नाट्यसंस्था "लिट्‌ल थिएटर- बाल रंगभूमी'ची स्थापना केली. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी बालनाट्ये त्यांनी सादर केली. "मधुमंजिरी', "कळलाव्या कांद्याची कहाणी', "जादूचा वेल', "गणपती बाप्पा मोरया', "चिनी बदाम', "अलीबाबा आणि चाळीस चोर' ही श्रीमती करमरकर यांनी सादर केलेली बालनाटके प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील.

Web Title: mumbai news sudhatai karmarkar death