तुषारच्या उपचारासाठी हवी समाजाची साथ

हर्षदा परब
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

आजीने मूत्रपिंड दिल्याने झाले प्रत्यारोपण

आजीने मूत्रपिंड दिल्याने झाले प्रत्यारोपण
मुंबई - मूत्रपिंडातील दोषामुळे उंची वाढत नसल्याने नाशिकमधील तुषार ठाकरे या मुलावर 15 दिवसांपूर्वी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्याच्या आजीने मूत्रपिंड दिल्याने ही शस्त्रक्रिया होऊ शकली. त्याच्या पुढील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागणार आहेत. हा पैसा आणायचा कुठून ही चिंता शेतकरी असलेल्या ठाकरे कुटुंबाला सतावते आहे. त्यासाठी समाजातील दात्यांनी पुढे यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

तुषारची उंची वाढत नसल्याने त्याचे वडील वासुदेव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूर्वी त्याला मालेगाव, सटाणा, नाशिक येथील डॉक्‍टरांकडे दाखवले. तेव्हा तो चौथीत शिकत होता. डॉक्‍टरांनी केलेल्या उपचाराचा फायदा होत नसे. काही महिन्यांनी त्याला नाशिक येथील हार्मोनी हेल्थ हब रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तुषारवर हार्मोन्सची ट्रीटमेंट सुरू केली. अनेक दिवस झाल्यानंतरही औषधोपचारांचा परिणाम न दिसल्याने तुषारची सोनोग्राफी करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. त्यात तुषारच्या मूत्रपिंडाचा आकार छोटा असल्याचे आढळले. तेव्हा डॉक्‍टरांनी तुषारला उपचारांसाठी मुंबईत नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार परळ येथील वाडिया रुग्णालयात तुषारवर उपचार सुरू झाले. वर्षभराच्या उपचारानंतरही तुषारच्या मूत्रपिंडाचा आकार न वाढल्याने डॉक्‍टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला.

काही दिवसांपूर्वी तुषारची आजी रेखाबाई (54) यांनी नातवाला मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक रुग्णालयात तुषारवर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता त्याच्या पुढील उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांची धडपड सुरू आहे. मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडेही संपर्क साधला होता. तेथूनही त्यांना मदत मिळाली नाही.

ठाकरे कुटुंबाची गावात दोन एकर जमीन आहे. या दोन एकर जमिनीत जे उगवते त्यावर घर चालते, असे ठाकरे यांनी सांगितले.

येथे पाठवा मदत
बॅंकेचे नाव - बॅंक ऑफ बडोदा
शाखा - नामपूर (सटाणा), महाराष्ट्र
खाते क्रमांक - 31040100004029
आयएफसी कोड - DARB- NAMPUR

किडनीतील दोषामुळे तुषारच्या उंचीवर परिणाम झाला. शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची वाढण्याची 25 ते 30 टक्के शक्‍यता आहे.
- डॉ. अजित सावंत, तुषारवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर

Web Title: mumbai news tushar thakare treatment help