मुलांचे वाडिया रुग्णालय आजारी 

हर्षदा परब
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई -  परळच्या वाडिया रुग्णालयात आणखी काही शिशू अतिदक्षता विभागांची (एनआयसीयू) नितांत आवश्‍यकता असली, तरी निधी नसल्याने ते सुरू करता येत नाहीत. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयानंतरही एनआयसीयूसाठी मंजूर केलेला निधीही सरकार नियमितपणे देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई -  परळच्या वाडिया रुग्णालयात आणखी काही शिशू अतिदक्षता विभागांची (एनआयसीयू) नितांत आवश्‍यकता असली, तरी निधी नसल्याने ते सुरू करता येत नाहीत. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयानंतरही एनआयसीयूसाठी मंजूर केलेला निधीही सरकार नियमितपणे देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आशियातील सर्वांत मोठी एनआयसीयू मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात आहे. या बाल रुग्णालयात अत्यवस्थ बालकांवर उपचार करण्यात येतात. रुग्णालयात प्रसूतीही केल्या जात असल्याने तेथे एनआयसीयूची आवश्‍यकता होती. 2014 मध्ये कोर्टात कामयानी महाबळ यांनी केलेल्या जनहित याचिकेबाबत निकाल देताना कोर्टाने एनआयसीयूसाठी निधी देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही कधीच पूर्ण निधी आला नसल्याची माहिती रुग्णालयातील एका डॉक्‍टरने दिली. ठरवून दिलेला निधी कधीच रुग्णालयात आला नाही, असेही या डॉक्‍टरने सांगितले. 

यासंदर्भात वाडिया रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. मिनी बोधनवाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब थेट मान्य करणे टाळले; मात्र निधीअभावी एनआयसीयूच्या क्षमतेत वाढ करता येत नाही. जागा आणि मनुष्यबळ असतानाही आणखी काही बेड वाढवण्यात अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करणे, इम्युनिटी क्‍लिनिक यासारख्या सुविधा सुरू केल्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या रुग्णालयात एनआयसीयूच्या 200 खाटा आहेत. त्यात आणखी 50 खाटांची वाढ करता येऊ शकते; मात्र निधीअभावी हे शक्‍य होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

वाडिया रुग्णालयात पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. डहाणू तालुक्‍यातून सर्वाधिक रुग्ण येतात. ते गरीब असल्याने त्यांच्या पालकांना संस्थांकडे मदत मागावी लागते. रुग्णालयाने पालघर, डहाणू या भागात कुपोषणाच्या प्रश्‍नावर काम करण्याची जबाबदारी घेतल्याने कुपोषणाचे रुग्णही येतात. ट्रस्टकडून निधी मिळवून उपचार केले जातात, असेही डॉ. बोधनवाला यांनी सांगितले. 

वाडियातील रुग्ण 
- दरवर्षी सुमारे 4000 रुग्ण उपचार घेतात 
- 50 टक्के रुग्ण कमी वजनाची किंवा प्रीमॅच्युअर मुले 
- जन्मापासून व्यंग असलेले 20 टक्के रुग्ण 
- गुणसूत्रांमध्ये दोष असललेले 3-4 टक्के रुग्ण 
- गुंतागुंतीची प्रसूती, इतर आजाराचे 10 ते 15 टक्के रुग्ण 

Web Title: mumbai news Wadia Hospital