इंधनवाढीचा भडका! भविष्यातही इंधन दरवाढ सुरुच राहणार, अर्थतज्ज्ञांचा इशारा

प्रशांत कांबळे
Sunday, 21 February 2021

गेल्या 9 फेब्रुवारी पासून सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमूळे मुंबईत पेट्रोल 97 रूपये तर डिझेल 88.6 रूपयांवर पोहोचले आहे.

मुंबई: आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव  26.5 रूपये प्रतिलीटर प्रमाणे असताना, देशात इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोसळले आहे.  केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करांमुळे देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याचे चित्र आहे. प्रति लिटर पेट्रोलमागे केंद्र 32.9 रुपये तर राज्य सरकार 26.78 रूपयांचे विविध कर आकारत आहे. कोविडमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत कुणीही आपल्या महसूलावर पाणी सोडण्यास तयार नाही. 

आयात केलेल्या कच्या तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेलची निर्मिती केली जाते. त्यानंतर प्रक्रियेचा, वाहतुकीचा तसेच पणनाचा खर्च आणि नफा जवळपास 3.75 रूपये प्रतिलीटर होतो. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू केला जातो. यामध्ये प्रतिलीटर मुलभूत उत्पादन शुल्क 1.4 तर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 11 रूपये आणि कृषी संरचना आणि विकास उपकर 2.5 रूपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क (रोज अँड इन्फ्रा सेस) 18 रूपये असे मिळून 32.9 रूपयांचे विविध आकारल्या जाते. राज्य सरकार सुद्धा  आपले कर लावतात, त्यामध्ये 25 टक्के व्हॅट म्हणजेच 16.66 रूपये आणि 10.12 रूपये अतिरिक्त कर यामध्ये लागतो. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरल्या जाते. डिझेलचे दर सुद्धा याचप्रमाणे ठरवण्यात येते. 

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे डॉलर मधील दरांमध्ये घट झाली आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करांमुळे इंधनाच्या किंमती कमी झाल्या नाही, उलट त्या वाढल्या आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूलांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामूळे इंधनावरील कर कमी केल्यास वित्तीय तूट निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने, केंद्र आणि  राज्य सरकारने लावलेले कर कमी होण्याची शक्यता नसल्याने भविष्यात इंधनाचे दर असेच वाढत राहणार असल्याचे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी  यांनी म्हटले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  
मुंबईत पेट्रोल 97 रूपये, तर डिझेल 88.6 रूपये लिटर

गेल्या 9 फेब्रुवारी पासून सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमूळे मुंबईत पेट्रोल 97 रूपये तर डिझेल 88.6 रूपयांवर पोहोचले आहे. शनिवारी पेट्रोलमध्ये 38 पैसे तर डिझेलमध्ये 39 पैशांने वाढ झाली आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास मुंबईत पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्‍यता आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai petrol diesel prices increase 12th day petrol touches 97 per litre


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai petrol diesel prices increase 12th day petrol touches 97 per litre