मुंबई पोलिसांचा सनसनाटी खुलासा, उध्वस्त केलं चॅनल्सचं 'फेक TRP रॅकेट', रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी

सुमित बागुल
Thursday, 8 October 2020

रिपब्लिक टीव्हीतील संबंधित कर्मचाऱ्यांना समन्स बजावण्यात येईल. सोबतच मुंबई पोलिस या  तपासाबाबत प्रोटोकॉल प्रमाणे सर्व माहिती भारत सरकार आणि माहिती आणि दूरसंचार विभागालाही देणार आहे.

मुंबई : आज मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केलाय. खुलासा आहे खोट्या TRP रॅकेटचा. मुंबई पोलिंसानी खोटं TRP रॅकेट उध्वस्त केलंय. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी खोट्या TRP चं रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती माध्यमांना दिलीये. या प्रकरणात तीन चॅनल्सची मुख्यत्वे नावं समोर आलेली आहेत. ज्यामध्ये सध्या खूपच चर्चेत असलेलं रिपब्लिक टीव्ही चं नाव आहे. सोबतच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या एकूण तीन चॅनलची आता TRP स्कॅम प्रकरणात समोर आलेली आहेत. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना मुंबई पोलिंसानी ताब्यात घेतलंय. याशिवाय रिपब्लिक चॅनलच्या ज्या कुणाचा या रॅकेटमध्ये समावेश असेल (कर्मचारी, प्रमोटर, मॅनेजिंग डायरेक्टर) त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. रिपब्लीक टीव्हीमधील संबंधित व्यक्तींना मुंबई पोलिस लवकरच समन्स बजावणार आहेत. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि चिटींग प्रकरणी या केसचा तपास केला जाईल.  

काय आहे मोडस ऑपरेंडी 

मुंबई पोलिसांच्या माहितीप्रमाणे BARC नावाची कंपनी TRP म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मोजण्याचं काम करते. BARC या कंपनीने काही शंका आल्याने मुंबई पोलिसांकडे TRP स्कॅम बाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली. TRP म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मोजण्यासाठी काही घरांमध्ये विशिष्ठ मशिन्स बसवण्यात येतात. ज्या घरांमध्ये TRP मोजण्याची मशिन्स बसवण्यात आलेल्या आहेत त्यांना पैसे देऊन काही विशिष्ठ चॅनल्स लावण्यास सांगितलं जायचं. यामध्ये हंसा कंपनीचं नाव प्रामुख्याने पुढे येतेय. हंसा नामक कंपनीकडे या मशिन्सच्या मेंटेनंस म्हणजेच डागडुजीचं कंत्राट होत. त्यामुळे स्वाभाविक पाने त्यांच्याकडे कुणाच्या घरात मशिन्स आहेत यांची  माहिती होती. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवलं जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तर हंसा कंपनीच्या काही आजी कर्मचाऱ्यांवर देखील पोलिसांना संशय आहे.  धक्कादायक बाबा म्हणजे एका घरात एका महिन्याला साधारण चारशे ते पाचशे रुपये दिले जायचे आणि त्यांना विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यास सांगितलं जायचं. मुंबई पोलिसांना अशीही काही घरं सापडली आहेत ज्या घरांमध्ये हे मशिन्स लावले गेलेत आणि त्या घरांमधील लोकं अशिक्षित आहेत. मात्र तरीही त्यांच्या घरी इंग्रजी चॅनल्स पहिली गेलीत. 

पुढील कारवाई काय ? 

मुंबई पोलिस याबाबत सखोल चौकशी आणि तपास करणार आहे. रिपब्लिक टीव्हीतील संबंधित कर्मचाऱ्यांना समन्स बजावण्यात येईल. सोबतच मुंबई पोलिस या  तपासाबाबत प्रोटोकॉल प्रमाणे सर्व माहिती भारत सरकार आणि माहिती आणि दूरसंचार विभागालाही देणार आहे. मुंबई पोलिसांचे केंद्रीय तपास पथक ACP शशांक यांच्या नेतृत्वात ही चौकशी करणार आहे. 

जाहिरातदार आणि चॅनल्स दोघांची चौकशी होणार : 

TRP च्या खेळामध्ये एका चॅनलचा TRP वाढला तर त्या चॅनलला जाहिरातींमधून मिळणारा पैसा वाढतो. हे गणित कोटींच्या घरातील असतं. म्हणूनच टीव्ही चॅनेलसाठी TRP अतिशय महत्त्वाचा असतो. यामध्ये ज्या चॅनलची नावं पुढे आलेली आहेत त्या चॅनलचे संबंधित मालक आणि कर्मचारी, हंसा कंपनीचे पोलिसांना संशय असेलेले सध्याचे कर्मचारी, आणि जाहिरात देणाऱ्या कंपन्या यांची देखील चौकशी होईल. जाहिरात देणाऱ्या कंपन्या यात सामील आहेत का हे देखील तपासलं जाईल.  

या प्रकरणात एका इसमाला अटक करण्यात आलेली आहे. या व्यक्तीच्या बँकेतून २० लाख रुपये आणि त्याच्या लॉकरमधून तब्बल आठ लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. 
mumbai police on fake TRP scam republic tv on the radar along with fakta marathi and box cinema


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police on fake TRP scam republic tv on the radar along with fakta marathi and box cinema