Mumbai Police: शहरातलं क्राईम रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट

अनिश पाटील
Monday, 25 January 2021

गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले आहे. या कारवाईत 1369 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 349 आरोपी सापडलेत.

मुंबई: गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले आहे. त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1369 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 349 आरोपी सापडले आहेत. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 66 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई पोलीसांनी 23 जानेवारीच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलिस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलिस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. 

सर्व 5 प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलिस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. प्रत्येक पोलिस ठाण्यांमधून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टीमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती आणि क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे आणि कोम्बिंग ऑपेरशनचे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी,अवैध दारू, जुगार इ. अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलिस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआउटमध्ये केलेली कारवाई पुढील प्रमाणे
 

 1. शहरात एकूण 223 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील 1369 आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये 349 आरोपी मिळून आले असून, 52 पाहिजे आणि फरारी आरोपींना अटक करण्यात आली.
 2. ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान घाटकोपर पोलिस ठाणे हद्दीत मोबाईल स्नॅचिंग करून पळून जाणाऱ्या 02 आरोपींना शिताफीने पकडून, अटक करण्यात आली.
 3. एकूण 66 व्यक्तींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
 4. अवैध शस्त्रे बाळगणा-या एकूण 33 जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली.
 5. सर्व पोलिस ठाण्यांचे हद्दीत एकूण 101 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
 6. त्यामध्ये एकूण 8597 दुचाकी/चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
 7. मोटारवाहन कायदयान्वये 2479 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
 8. कलम 185 मो.वा.का. अन्वये 12 वाहनचालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकूण 739 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.
 9. अवैध धंदयांवर 31 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यामध्ये 40 आरोपींवर कारवाई करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणे एकूण 444 तपासणी करण्यात आले.
 10. तडिपार केलेल्या एकूण 31 इसमांवर मपोका कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली.
 11. महाराष्ट्र (मुंबई) पोलिस कायद्याचे कलम 120,122 आणि 135 अन्वये एकूण 97 इसमांवर कारवाई करण्यात आली असून अनधिकृत 130 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
 12. अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण 59 आरोपी अटक करण्यात आली.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Police Operation All Out criminal activities raids combing exercises nakabandis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Police Operation All Out criminal activities raids combing exercises nakabandis