लॉकडाऊनमध्ये पश्‍चिम रेल्वेने घेतला फायदा; महामुंबईत तब्बल 13 पुलांची केली नव्याने उभारणी

कुलदीप घायवट
Saturday, 23 January 2021

पश्‍चिम रेल्वेने लॉकडाऊन काळातील कमी प्रवासी संख्येचा फायदा घेत या मार्गावरील 16 असुरक्षित पादचारी पुलांपैकी 13 पुलांची नव्याने उभारणी केली.

मुंबई : पश्‍चिम रेल्वेने लॉकडाऊन काळातील कमी प्रवासी संख्येचा फायदा घेत या मार्गावरील 16 असुरक्षित पादचारी पुलांपैकी 13 पुलांची नव्याने उभारणी केली. आयआयटी मुंबईद्वारे केलेल्या स्थापत्यविषयक परीक्षणानंतर (स्ट्रक्‍चरल ऑडिट) पश्‍चिम रेल्वेने प्रवासी सेवा वाढवली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान 115 पादचारी पुलांचे स्थापत्यविषयक परीक्षण करण्यात आले. यात 16 पादचारी पूल असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते बंद करण्यात आले. निश्‍चित वेळेत पादचारी पूल बंद आणि निश्‍चित वेळेत नव्या पुलांची उभारणी, असे दुहेरी आव्हान पश्‍चिम रेल्वे प्रशासनासमोर होते. ठराविक काळात ब्लॉक घेऊन असुरक्षित पुलांचे पाडकाम करण्यात आले. त्यामुळे पुलाखालून जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्या आणि प्रवाशांना त्याचा कोणत्याही व्यत्यय येणार नाही, अशी कामाची रचना करण्यात आली होती. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या दोन वर्षांत पश्‍चिम रेल्वेद्वारे 13 पादचारी पुलांचे पाडकाम करण्यात आले. यांपैकी आठ पादचारी पूल लॉकडाऊन काळात पाडण्यात आले. हे पूल 10 मीटर, 12 मीटर लांबीचे आहेत. यासह इतर 36 स्थानकांतील पादचारी पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. यासह लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग उन्नत मार्ग, ग्रांट रोड येथील फेरेरे उन्नत मार्गाचे काम वेगात सुरू आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये, गर्दीचे विभाजन तातडीने व्हावे यासाठी पादचारी पुलांची उभारणी सुरू आहे. पश्‍चिम रेल्वेवर एकूण 138 पादचारी पूल आहेत. लॉकडाऊन काळात 14 नवीन पुलांची उभारणी करण्यात आली आहे. तर, एका स्कायवॉकची निर्मिती केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी पश्‍चिम रेल्वे काम करीत आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 
mumbai railway marathi news Western Railway takes advantage of lockdown New construction of 13 bridges in Mumbai 

------------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai railway marathi news Western Railway takes advantage of lockdown New construction of 13 bridges in Mumbai