Mumbai Rains : मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग (व्हिडिओ)

water
water

मुंबई : शनिवारी रात्री पासूनच पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये पावसाची मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, तर रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीला ही यामुळे फटका बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली. सांताक्रुझमध्ये आज (रविवार) सकाळी साडेआठपर्यंत 204 मिमी, तर कुलाब्याला 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कुर्ला, किंग सर्कल, सायन गांधी मार्केट मध्ये पाणी साचले. गोरेगाव, दहिसर जोगेश्वरी मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले. दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाचे केले आहे. मुसळधार पावसामुळे मुलुंडमधील विद्युत सेवा खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे अनेक स्टेशन जलमय झाले आहेत. सीएसएमटी कर्जत-कसारा-खोपोली सेवा ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने सुरू सायन कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी सचल्याने आहे. नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ स्टेशनवर देखील ट्रॅकवर पाणी साचले आहे.

ठाणे-कल्याण स्थानकावर ट्रॅक वरती पाणी साचले आहे. हार्बर लाईनवर चुनाभट्टी स्थानकादरम्यान ट्रॅक वरती पाणी साचल्याने हार्बर सेवा देखील थॉप झाली आहे. हवामान विभागाने येत्या 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई उपनगर, ठाणे कल्याण, नवी मुंबईत ही पावसाने जोरदार बॅटिंग केली. दक्षिण मुंबईत देखील पाऊस जोरदार कोसळतोय. यामुळे अंधेरी, खार, मालाड सबवे मध्ये पाणी साचले आहे. जेव्हीएलआर, वेस्टर्न एक्सप्रेस आणि एलबीएस मार्गावर ही पाणीच पाणी बघायला मिळतंय.

मुंबईत मूसळधार पाऊस सुरुच आहे. रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. हार्बर आणि मध्य रेल्वे रुळावर पाणी भरल्याने ठप्प आहे. पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. पश्चिम उपनगरांतील चारही सबवे बंद आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरांमधे आणि दुकानांमधे पाणी शिरले आहे. पश्चिम आणि पूर्वद्रूतगती मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यात रेल्वे ठप्प झाल्याने सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. आज दुपारी 2 वाजता समुद्राला मोठी भरती आहे. पाऊस सुरुच राहिल्यास मुंबईकारांचे आणखी हाल होण्याचा धोका आहे. पश्चिम उपनगरांत मालाड, अंधेरी खार आणि मिलन सबवेत पाणी भरले आहे. दादर, हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल, लोअरपरळ, सायन, धारावी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरीवली, गोरेगाव, विक्रोळी, आदी सखल भागात पाणी साचले आहे. पावसाने आज रविवारी मुंबईकरांची कोंडी केली आहे.

कल्याण डोंबवली पाणी पुरवठा बंद
उल्हास नदी पत्रातील पाण्यात वाढ झाल्याने मोहिली पंपिंग स्टेशन केंद्रात पाणी साचले आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी विभागाने दिली.  कृपया नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पवई-आरे कॉलनी रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे पवई तलाव परिसरात पाणीच पाणी साचले आहे.शिवाय विहार तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मिठी नदीच पाणी पवई-आरे कॉलनी रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.ज्यांना पवईला यायचे आहे त्यांनी आरे रोडचा वापर न करता पवई गार्डन रस्त्याचा वापर करावा तर ज्यांना पाश्चिम द्रुतगती मार्गाने यायचे असेल त्यांनीही आरे रोडचा वापर न करता महामार्गाचा वावर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात झालेल्या पावसाच्या नोंदी
शहर - 146 मीमी
पूर्व उपनगर -  195 मीमी
 पश्चिम उपनगर - 195 मीमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com