NSE चे व्यवहार चार तास बंद, सेबी कडून गंभीर दखल; तत्काळ मागवला अहवाल

NSE चे व्यवहार चार तास बंद, सेबी कडून गंभीर दखल; तत्काळ मागवला अहवाल

मुंबई - तांत्रिक बिघाडामुळे आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) सुमारे चार तास बंद ठेवावे लागल्याची गंभीर दखल घेताना बाजार नियंत्रक सेबी ने यासंदर्भात एनएसई कडून दोन दिवसांत अहवाल मागितला आहे. सुदैवाने बाँबे स्टॉक एक्सचेंज च्या व्यवहारांवर कोणताही परिणाम न होता ते व्यवहार सुरुळित सुरु राहिले. 

राष्ट्रीय शेअर बाजाराला दूरसंचार पुरवठा करणाऱ्या दोघा पुरवठादारांच्या लिंक मध्ये अडचण निर्माण झाल्याने हा गोंधळ झाला. शेअर व्यवहार करणाऱ्या दलालांना एनएसई कडून सतत मिळणारे व्यवहारांचे बदलते दर सकाळपासूनच मिळेनासे झाले. एकदा आलेले दर सतत हँग होत असल्याने तेच दर स्क्रीन वर दिसत होते. रिफ्रेश करूनही नवे दर दिसत नव्हते आणि ताजे दरही दिसत नव्हते. 14,781 ते 14,820 वर निफ्टी अडकून पडला होता. त्यामुळे व्यवहार करताना चुका आणि गोंधळ होण्याची शक्यता असल्याने 11 वाजून 40 मिनिटांनी फ्यूचर अँड ऑप्शनचे तर तीन मिनिटांनी समभागांचे सौदे थांबविण्यात आले. त्यामुळे शेअर बाजारात चांगलाच गोंधळ उडाला. ज्यांनी बाजार बंद पडण्यापूर्वी व्यवहार केले होते, त्यांचे जीव टांगणीला लागले. 

वेळ वाढवली
...............
तंत्रज्ञांनी तांत्रिक गोंधळ दूर करण्यास सुरुवात केली व दीड वाजता व्यवहार सुरु होतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र तेव्हाही व्यवहार सुरु न झाल्याने अखेर साडेतीन वाजता व्यवहार सुरु करण्याचे ठरले. त्यानुसार तेव्हापासून पाच साडेपाच वाजेपर्यंत व्यवहारांची वेळ वाढवून देण्यात आली. नंतर मात्र या वाढीव वेळेत कोणताही गोंधळ झाला नाही. सामान्यतः रोजच्या व्यवहारांची वेळ दुपारी साडेतीन वाजता संपते. 

सेबी ने या प्रकाराची गंभीर दखल घेताना एनएसई कडून दोन दिवसांत यासंदर्भात अहवाल मागितला आहे. असे प्रकार टाळण्यासाठीच्या उपाययोजनाही सुचविण्यास सेबीने सांगितले आहे. यापूर्वीही अनेकदा एनएसई वर असाच गोंधळ झाला आहे. असे गोंधळ नवे नाहीत, पण त्यावर उपाय योजले पाहिजेत, असे एलीक्सिअर इक्वीटीज चे संचालक दीपेन मेहता यांनी सांगितले. 

निर्देशांक वधारले
.........................
हा तांत्रिक बिघाडाचा गोंधळ संपल्यावर शेअर बाजाराने आज जोरदार मुसंडी मारली. सरकारशी संबंधित बँकिंग व्यवहार (पेन्शन, करभरणा, अल्पबचत इ.) करण्यास खासगी बँकांना परवानगी देण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर आज बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आज भारतीय निर्देशांक सुमारे दोन टक्क्यांपर्यंत वाढले. सेन्सेक्स 1,030 अंशांनी तर निफ्टी 274 अंशांनी वाढला. 

निफ्टीचे व्यवहार दुपारी साडेतीन वाजता सुरु झाल्यावर निफ्टीने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्सदेखील दिवसभर पन्नास हजारांच्या खालीच होता पण साडेतीन नंतर तो एकावन्न हजारांच्या जवळ गेला. साडेपाच वाजता व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 50,781 अंशांवर तर निफ्टी 14,982 अंशांवर स्थिरावला. आज एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, स्टेट बँक दोन ते पाच टक्के वाढले. कोटक बँक, रिलायन्स, इंडसइंड बँक, एअरटेल, महिंद्र आणि महिंद्र यांचे दरही एक ते दोन टक्के वाढले. डॉ. रेड्डी, टीसीएस, मारुती, सनफार्मा यांच्या दरात एक टक्क्यापर्यंत घसरण झाली

----------------------------------------------- 

( Edited by Tushar Sonawne )

mumbai share marker marathi news NSEs transactions closed for four hours sebi ask report live latest update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com