मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - पाकिस्तानातून दहशवादी प्रशिक्षण घेऊन आलेल्या 32 वर्षीय संशयित दहशतवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतीच बोरीवली येथून अटक केली. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा खान याच्या संपर्कात हा तरुण असल्याचा संशय आहे. मुंबईसह आणखी महत्त्वाची ठिकाणे व राजकीय व्यक्ती संशयित दहशतवाद्याच्या रडावर होते.

मुंबई - पाकिस्तानातून दहशवादी प्रशिक्षण घेऊन आलेल्या 32 वर्षीय संशयित दहशतवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतीच बोरीवली येथून अटक केली. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा खान याच्या संपर्कात हा तरुण असल्याचा संशय आहे. मुंबईसह आणखी महत्त्वाची ठिकाणे व राजकीय व्यक्ती संशयित दहशतवाद्याच्या रडावर होते.

फैजल मिर्झा असे संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. तो जोगेश्‍वरी येथील येथील बेहरामबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली कोलकता स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) माहितीच्या आधारावर एटीएस जुहू कक्षाने संशयित दहशतवाद्याला अटक केली. शस्त्र चालवणे, बॉंब बनवणे, आत्मघाती हल्ले करणे, आगी लावणे अशा कृत्यांचे त्याने प्रशिक्षण घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या देखरेखीखाली हे सर्व घडले. विविध सोशल मीडिया माध्यमातून मिर्झा त्याच्या म्होरक्‍याच्या संपर्कात होता.

त्याच्या सांगण्यावरून तो शारजाला गेला होता. तेथे काही दिवस राहिल्यानंतर दुबई मार्गे कराचीला गेला. तेथे त्याने तीन महिन्यांचे दहशवादी प्रशिक्षण घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंबईसह देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, वर्दळीची ठिकाणे व अत्यावश्‍यक सेवा पुरवणारी आस्थापना यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती. राज्यातील एक प्रभावशाली नेता या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संशयित दहशतवाद्याला 11 मेस अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याबाबत एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासाठी संपर्क साधला असता संशयित दहशतवाद्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोन वुल्फ ऍटॅक
अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी "लोन वुल्फ ऍटॅक' करणार होता. त्यात एकटा दहशतवादी वर्दळीच्या ठिकाणी गाडी घुसवतो अथवा बेछूट गोळीबार करतो. केमिकल कंपनी अथवा वर्दळीच्या ठिकाणी शिरून बेछूट गोळीबार करायचा, स्फोट घडवायचे, असा दहशवाद्यांचा मनसुबा होता. त्याबाबत मिर्झा सोशल मीडियावरून पाकिस्तानात संपर्कात होता. पण हे संभाषण कोलकाता एसटीएफच्या हाती लागले आहे.

कोण आहे आमीर रझा खान?
इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा हा भारतातील 50 टॉप मोस्ट वॉन्टेड यादीतील आरोपी आहे. त्याच्यावर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) दहा लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. बाटला हाउस चकमकीतून भटकळ बंधूसोबत त्याचा दुरावा निर्माण झाला. त्यानंतर पाकिस्तानात पलायन केल्यानंतर आमीरने अल कायदाला झुकते माप दिले होते. त्यानंतर तो लष्करे तय्यबाच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते. इंडियन मुजाहिदीने घडविलेल्या बॉंबस्फोटांमधील संशयित दहशताद्यांना आमीरने मदत पुरवल्याचा आरोप आहे.

Web Title: mumbai terrorist target