Mumbai : एसटी बँकेतील सभासदांच्या पैशांची उधळपट्टी ; सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : एसटी बँकेतील सभासदांच्या पैशांची उधळपट्टी ; सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा आरोप

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँके इततील संचालक मंडळाने सभासदांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर अध्यक्ष असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाने सहकार विभागाच्या आयुक्तांकडे केला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ( १९६० चे कलम ८३ व ८८ नुसार चौकशी करण्याची मागणी केली आहे. एसटी बँकेच्या निवडणुका जवळ आल्या असून, निवडणुकीचा कार्यक्रम कधीही घोषित होईल अशी परिस्थिती असतांना बँकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निवडणुकीपूर्वीच जुंपल्याचे दिसून येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या अडीअडचणी वेळेस मदत करावी या उद्देशाने ७० वर्षापूर्वी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटि बँकेची स्थापना झाली आहे. संचालक मंडळाने अनावश्यक खर्चावर नियंत्रण राखून बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी व सभासदांच्या हितासाठी आपल्या पदाचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र, संचालकांनी पदाचा गैरवापर करीत स्वहित साधण्याचा उद्देश ठेऊन सबळ कारणाशिवाय लाखो रुपयांची उधळपट्टी करून एसटी कामगारांची फसवणूक केली आहे. या संचालक मंडळाने प्रसिध्द केलेल्या वार्षिक अहवालावरून बँकेतील कामगारांच्या हक्काच्या पैशांची मनमर्जी उधळपट्टी केल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी केला आहे.

अहवालातील आक्षेप असलेल्या खर्चाचा तपशील

- कोरोणात निर्बंध असताना सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ व इतर सभांसाठी २०२१ मध्ये ४८,८२,२६१.१२ तर २०२२ मध्ये ९३,३५,७०० असा वारेमाप खर्च दाखवला

- टपाल व टेलिफोन खर्च २०२१ मध्ये ११४२८६७.६१ तर २०२२ मध्ये १३४१३२१.७५ इतका खर्च

- सांविधीक व अंतर्गत तपासणी फी २०२१ मध्ये १३७५०००, तर २०२२ मध्ये ६८२१९६८

- स्टेशनरी, छपाई व जाहिरात यासाठी खर्च २०२१ मध्ये ४८७२१३९.५८, तर २०२२ मध्ये ५९२९११९.३८ इतका खर्च

- वाहतूक भाडे खर्च २०२१ मध्ये १२५९८०.६६ तर २०२२ मध्ये ८६०५०३.४५ इतका खर्च

बँकेच्या खर्चावर घेण्यात आलेले आक्षेप प्रशासन म्हणून आम्हाला मंजूर नाहीत, बँकेतील खर्चासंदर्भात संपूर्ण नोंदी आमच्याकडे आहे. कोरोणच्या काळात निर्बंध असतानाही बँकेचे ऑनलाईन काम सुरू होते. त्यामुळे खर्च झालं आहे. ऑनलाईन मीटिंग घेतांना त्यासंबंधित स्टुडिओ आणि त्याचे तंत्रज्ञान भाड्याने घ्यावे लागतात, शिवाय संचालकांचा येण्या जाण्याचा राहण्याचा खर्च करावा लागतो, आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. पैशांमध्ये कुठलीही अनियमितता नाही.

- दिलीप कान्हेरे, व्यवस्थापकीय संचालक, स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक