रोजगारक्षम शिक्षण देण्यात मुंबई विद्यापीठ देशात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

क्‍यूएस ग्रॅज्युअट एम्प्लॉयबिलिटी रॅंकिंगनुसार देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुंबई : क्‍यूएस ग्रॅज्युअट एम्प्लॉयबिलिटी रॅंकिंगनुसार देशातील पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वोत्तम रोजगारक्षम शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे. 

क्वाकरेली सायमंड (क्‍यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली. क्‍यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाचे जागतिक स्थान 252 ते 300 च्या दरम्यान आहे. त्यामुळे देशातील सातव्या क्रमांकाची संस्था होण्याचा बहुमान विद्यापीठाला मिळाला आहे.

क्‍यूएसने जाहीर केलेल्या "इंडिकेटर'नुसार एम्प्लॉयेर रेप्युटशन 292, ऍल्युमनाई आऊटकम 41, एम्प्लॉयर स्टुडंट्‌स कनेक्‍शन 201, पार्टनरशीप विथ एम्प्लॉयर 201, ग्रॅज्युअट एम्प्लॉयमेंट रेट 201 हून अधिक असल्याची नोंद घेण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद घेत 100 पैकी 87.2 गुण विद्यापीठाला मिळाले आहेत. 

मुंबई विद्यापीठाने पाच वर्षांत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात 104 टक्‍क्‍यांनी पदवी आणि 112 टक्‍क्‍यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 147 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 791 संलग्न महाविद्यालयांत सात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University is the first in the country to offer employable education