esakal | मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी धोक्यात

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाची इमारत धोकादायक झाली असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट येथील जगन्नाथ शंकरशेठ वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रार केल्यानंतरही विद्यापीठाकडून डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष केल जात आहे. दरम्यान वसतिगृहाच्या छताचा भाग ठिकठिकाणी कोसळू लागल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. 

मुंबई विद्यापीठाचे चर्चगेट येथे वसतिगृह असून या वसतिगृहाची इमारत 1958 मध्ये बांधण्यात आली होती. सध्या या वसतिगृहात 175 विद्यार्थी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खोल्यांतील स्लॅबचा भाग कोसळू लागला आहे. काही दिवसांपूर्वी वसतिगृहाच्या एका खोलीत स्लॅबचा काही भाग कोसळला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या लॅपटॉपचे नुकसान झाले.

याआधीदेखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाला पत्रदेखील पाठवले आहे; मात्र त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्य करत आहेत. तसेच 7 ते 8 खोल्या अधिक धोकादायक असल्याने त्या खोल्यांतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाटीवाटीने वास्तव्य करावे लागत आहे. 
 

वसतिगृहाच्या दुरुस्तीचे आणि स्वच्छतेचे काम विद्यापीठाने तातडीने हाती घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात; अन्यथा विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल. 
- जिरी धुरी, राज्याध्यक्षा, विद्यार्थी भारती 
 
 

loading image
go to top