मुंबई विद्यापीठाचे निकाल खोळंबले 

मुंबई विद्यापीठाचे निकाल खोळंबले 

Published on

मुंबई - मुंबई विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 2019 मधील उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत; परंतु मागील वर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पाचव्या सत्रातील तब्बल 150 परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. त्यामुळे धास्तावलेल्या मनस्थितीतच विद्यार्थ्यांना या वर्षाच्या पहिल्या सत्रातील परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. 

मुंबई विद्यापीठाने ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुमारे 170 परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर केले आहेत; मात्र 150 परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. पदव्युत्तर अभ्यासक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे यंदा या परीक्षा घेण्यास उशीर झाला. काही परीक्षा तर सुरूच आहेत. विद्यापीठाने काही विद्याशाखांतील पसंतीनुसार श्रेणी पद्धतीने घेतलेल्या पाचव्या सत्राच्या काही परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. वाणिज्य, विज्ञान शाखांचे निकाल लागले असले तरी कला शाखेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्याचप्रमाणे स्वयंअर्थसहायित अभ्यासक्रमांचेही निकाल रखडले आहेत. सुमारे 50 हजार विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. 

पाचव्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहाव्या सत्राची परीक्षा देता येईल; परंतु चिंताग्रस्त मनस्थितीतच त्यांना या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पाचव्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सहाव्या सत्राच्या परीक्षेनंतर होणार आहे. पाचव्या सत्राची परीक्षा मे महिन्यात होईल. त्यामुळे पदवीचे अंतिम निकाल जाहीर होण्यासही विलंब लागणार असल्याने पाचव्या सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती प्राध्यापक व्यक्त करत आहेत. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला नवीन संचालक मिळाल्यानंतर तरी विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागतील, अशी आशा होती. उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही पाचव्या सत्राचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी असाच खेळ करत राहिल्यास आम्ही कुलपती तथा राज्यपालांकडे दाद मागू. 
- प्रा. सुभाष आठवले, महासचिव, मुक्ता (मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन) 

मुंबई विद्यापीठाने महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. उर्वरित निकालही लवकरच जाहीर होतील. कला शाखेचा निकाल रविवारी जाहीर होईल. 
- विनोद माळाळे, उपकुलसचिव (जनसंपर्क), मुंबई विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com