Mumbai : वनवासी कल्याण आश्रमाच्या नावे देणगीदारांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Mumbai : वनवासी कल्याण आश्रमाच्या नावे देणगीदारांची फसवणूक

डोंबिवली : वनवासी कल्याण आश्रम ही संस्था गेले कित्येक वर्षे सामाजिक कार्य करत आहे. या संस्थेच्या नावाची बनावट देणगी पावती पुस्तक तयार करुन अनेक देणगीदारांकडून एक तरुणी देणगी गोळा करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तरुणींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठाणे पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणी, जव्हार, मोखाडा या भागांसह राज्याच्या दुर्गम आदिवासी भागात आदिवासी समाजासाठी वनवासी कल्याण आश्रम ही संस्था गेले अनेक वर्षे काम करत आहे. आश्रमच्या शाळेत अनेक आदिवासी मुले आज शिक्षण घेत आहे. भाजपा, संघ मधील अनेक कार्यकर्ते नोकरी सांभाळून या संस्थेचे कार्य करत आहेत. अनेक मोठमोठे देणगीदार स्वइच्छेने संस्थेच्या कामकाजासाठी संस्थेला देणगी देत असतात. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील वनवासी कल्याण आश्रमच्या नावाने रोख रक्कम स्वरुपात देणगी नागरिकांकडून घेतली जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्या कानावर होती. त्यातच दत्तनगर परिसरात राहणारे एका गृहस्थांच्या घरी एक तरुणी आली.

तिने आपण आश्रमच्या कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तिच्याजवळील पावती पुस्तकातील ठराविक रकमेची पावती तिने तयार करुन देणगीदाराच्या हातात दिली. संस्थेचा व्यवहार चोख ठेवण्यासाठी आश्रमकडून धनादेशद्वारे देणग्या स्वीकारत असल्याचे देणगीदारांना माहित असल्याने त्यांनी धनादेश बनविला. मात्र धनादेश न देता रोख रक्कम द्या असे तरुणीने त्यांना सांगितले व देणगी घेऊन गेली. संबंधित देणगीदारांना संशय आल्याने त्यांनी आश्रममधील एका मित्राला रोख स्वरुपात आश्रमला देणगी दोन तरुणींकडे दिली असल्याचे सांगितले. यावर संबंधित कार्यकर्त्याने चौकशी करुन अशा स्वरुपाच कोणीही डोंबिवलीत देणगीसाठी फिरत नाही. तसेच रोख रक्कम आश्रमद्वारे स्विकारली जात नाही असे सांगितले. त्यावेळी देणगीदाराने ती पावती त्या कार्यकर्त्यास पाठविली असता पावती बनावट असल्याचे आढळून आले.

बनावट पावतीच्या आधारे देणगीदाराची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात रविवारी संबंधित तरुणींविरोधात तक्रार दाखल केली असल्याचाी माहिती कार्यकर्त्यांनी दिली. दत्तनगर परिसरातील सीसीटिव्ही तपासण्यात आले आहेत या सीसीटिव्ही मध्ये तरुणी कैद झाली असून रामनगर पोलीस त्याआधारे तरुणीचा शोध घेत आहेत.