मुंबईकरांना दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच; धरणांतील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ नाहीच

तुषार सोनवणे
Saturday, 18 July 2020

सुद्धा मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांंमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदवली गेली आहे.परंतु तरी सुद्धा मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांंमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच असल्याची माहिती समोर आली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी शेअर केला विठ्ठल-रखुमाईचा फोटो...

मुंबई आणि उपनगरांमधील नागरिकांना अप्पर वैतरणा,मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या धरणांमधून दररोज 3750 दशलक्ष लीटर  पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणांमध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 दशलक्ष  लीटर पाणीसाठा उपलब्ध असला तरच मुंबईला पुढील वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होत असते. यावर्षीच्या जून महिन्यात मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या होत्या. परंतु त्यानंतर खुप वेळ पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने पुन्हा जोर धरल्याने, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु ही वाढ पुरेशी नाही. जुलै महिण्यात अपेक्षित असलेल्या पाणीसाठ्याच्या 3.38 लाख दशलक्ष लिटर पाण्याची तूट सध्या नोंदवण्यात आली आहे

कोरोनावर समाज माध्यमी उपचार नकोच; उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा...

या धरणांपैकी अप्पर वैतरणा आणि मोडकसागरमध्ये गुरूवारी ( 16 जुलै ) रोजी पाऊस झालेला नाही. तानसा, मध्य वैतरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी 2 मिमी तर भातसा धरणात 4 मि.मी पावसाची नोंद झाली. वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये 17 जुलै पर्यंत 3 लाख 81 हजार 153 दशलक्ष लिटर जलसाठ्याची नोंद झाली आहे, ही नोंद गेल्या वर्षी असलेल्या जलसाठ्यापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या सातही धरणांमध्ये 7 लाख 38 हजार दशलक्ष लिटर पाण्याची नोंद करण्यात आली होती.  तर 16 जुलै 2018 ला या धरणांमध्ये 10 लाख 34 हजार 571 दशलक्ष लिटर पाणी होते. त्यामुळे मुंबई उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला असला तरी, तो पुरेसा नाही . तसेच सप्टेंबर महिन्यापर्यंत या धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars are still waiting for good rains; There is not enough water for dams