ताप, सर्दी, खोकल्याने मुंबईकर हैराण 

​सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

तापमान अचानक वाढल्यामुळे नागरिक ताप, सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत. हा व्हायरल इन्फेक्‍शनचा (विषाणूजन्य संसर्ग) प्रकार असून, रुग्णांत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. 

मुंबई : तापमान अचानक वाढल्यामुळे नागरिक ताप, सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत. हा व्हायरल इन्फेक्‍शनचा (विषाणूजन्य संसर्ग) प्रकार असून, रुग्णांत तब्बल 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. 

मुंबईतील हवामानात अचानक बदल होत आहेत. मंगळवारी किंचित गारवा होता; मात्र बुधवारी तापमानात मोठी वाढ झाली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे तापमान मुंबईत नोंदवण्यात आले. महामुंबईतील तापमानातही सतत वाढ होत असल्याने विषाणुजन्य संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत.

मालाड येथील डॉ. जयेश लेले यांनी दोन दिवसांत ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण 15 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे सांगितले. वातावरणात बदल झाल्यावर व्हायरल इन्फेक्‍शनचे आजार वाढतात, असे गोरेगाव येथील डॉ. राजेंद्र धुरी म्हणाले. 

वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना जास्त त्रास जाणवतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

आजारी पडल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या, प्रतिजैविक (अँटिबायोटिक्‍स) औषधे घेणे टाळा, असा सल्ला त्यांनी दिला. अतिथंड पाणी, रस्त्यावरील फळांचे रस आणि सरबत पिऊ नका; तसेच रस्त्यावरील बर्फ खाणे टाळा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

त्वचारोगाची शक्‍यता 
उन्हामुळे सतत घाम येत असल्याने खाज येऊन त्वचारोग होण्याची शक्‍यता असते. त्वचेवर चट्टे उठणे, गजकर्ण असे आजार होऊ शकतात. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात फिरणे टाळावे. शक्‍यतो सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरावेत, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars Troubled from Fever, Cold and cough