सकारात्मक! मुंबईच्या वातावरणाने घेतला मोकळा श्वास

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 12 April 2020

  • मुंबईची हवा झाली शुद्ध
  • लॉकडाऊनचा असाही चांगला परिणाम

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण असताना मुंबईसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या मुंबईसह देशभरात लॉकडाऊन असल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था, उद्योगधंदे बंद असल्याने मुंबईच्या प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. अनेक भागांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या हवेची नोंद करण्यात आली. सफर या हवेच्या गुणवत्ता नोंदवणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यातही अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहे. अपवाद वगळता बहुतांश उद्योगधंदे बंद आहेत. त्याचा चांगला परिणाम म्हणजे मुंबई शहरासह उपनगरातील हवेचा दर्जा कमालीचा सुधारला आहे. भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरिवली, बीकेसी, चेंबूर आणि अंधेरी या भागातील हवेची गुणवत्ता उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. मालाड, नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊन जारी होण्यापूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला होता. शिवाय, हवेत प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते, पण आता हवेचा दर्जा सुधारला असून ही मुंबईकरांसाठी सकारात्मक बाब आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत बांधकामाची धूळ, वाहनांमधील प्रदूषण तसेच काही कारखान्यांमधील धुरामुळे हवा दूषित होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणची बांधकामे बंद झाली असून, वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच, कारखान्यांवरही नियंत्रण आल्याने प्रदूषणाच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

प्रत्येक घनमीटर हवेतील तरंगते धुलिकण (पीएम 2.5 चे प्रमाण मायक्रोग्रॅममध्ये )

मुंबई सरासरी -76 
भांडूप - 65
कुलाबा - 83 
मालाड - 108 
माझगाव - 49 
वरळी -82
बोरीवली - 93
चेंबूर - 43
वांद्रे कुर्ला संकूल - 61
अंधेरी - 57
नवी मुंबई - 120 

----------------

हवेची श्रेणी 

0 ते 50 - चांगली 
50 ते 100 - समाधानकारक 
100 ते 150 - मध्यम
Mumbais climate becomes pure


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbais climate becomes pure