esakal | मुंबईत दोन मिनिटांत मिळत होता खोटा कोरोना रिपोर्ट; दोघे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Duplicate corona negative report
  • मुख्य आरोपीसह दोघांना अटक

  • नोकरीसाठी 10 ते 15 जणांना अहवाल दिल्याचा संशय

  • हजार रुपयांना अहवाल विकायचा

मुंबईत दोन मिनिटांत मिळत होता खोटा कोरोना रिपोर्ट; दोघे अटकेत

sakal_logo
By
- अनिश पाटील

नोकरीसाठी 10 ते 15 जणांना अहवाल दिल्याचा संशय

मुंबई: नोकरीसाठी आवश्यक असल्यास निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल(आरटीपीसीआर) पुरवणाऱ्याला कुलाबा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी स्वतःचा RT-PCR अहवाल ऑनलाईन एडिटरवर एडिट करून विकत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीने अहवाल दिलेल्या एका स्वयंपाकीलाही पोलिसांनी अटक केली आहे. एक हजार रुपये घेऊन आरोपीने 10 ते 15 जणांना हे अहवाल दिल्याचा प्राथमिक संशय असून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. (Mumbai's Colaba Police Arrested 2 people related to fake corona test reports)

देविलाल जाट (24) व शांतिलाल मिनारिया (37) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील जाट याने बनावट आरटीपीसीआर अहवाल तयार करून शांतिलालला विकल्याचे पोलिसांनी सांगितले. कुलाबा येथील शाहबाझकर डायगोस्टिक प्रा. लि. चे संचालक नाझीम शाहबाझकर यांच्या तक्रारीवरून बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

हेही वाचा: कोरोनाकाळात मुंबईकरांसाठी दिलासा! 'नॉन-कोविड' रुग्ण वाढले

नक्की कसा घडला गुन्हा?

आरोपी शांतिलाल हा जानेवारी महिन्यात व्यावसायिक मुकेश बारचा यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला लागला होता. त्यापूर्वी बारचा यांनी शांतिलालला कोविड चाचणी करून त्याला अहवाल आणण्यास सांगितले होते. शांतिलालने हा अहवाल दिल्यानंतर त्यांनी शाहबाझकर यांच्याकडे त्याची तपासणी केली. त्यावेळी संबंधित क्रमांकावर देविलाल जाट नावाच्या व्यक्तीची तपासणी झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून शांतिलाल याने सादर केलेले अहवाल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शाहबाझकर यांनी या प्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून शांतिलालला अटक केली. त्यावेळी जाटने आपल्याला हा अहवाल दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली.

जाट याने लॅपटॉपवर ऑनलाईन पीडीएफ एडीटरचा वापर करून स्वतःचे नाव व इतर माहिती बदलून बनावट अहवाल तयार केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने वापरलेल्या लॅपटॉपचा शोध सुरू आहे. तसेच त्याने 10 ते 15 जणांना हजार रुपये घेऊन बनावट अहवाल दिल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

loading image