आकांक्षेपुढे गगन ठेंगणे!

मंगेश सौंदाळकर
बुधवार, 14 जून 2017

कुंटणखान्यातून सुटका झालेल्या तरुणीचे दहावीत यश

कुंटणखान्यातून सुटका झालेल्या तरुणीचे दहावीत यश
मुंबई - प्रेमविवाहानंतर वर्षभरातच पतीने सोडल्याने रस्त्यावर यावे लागल्यानंतर दिल्लीतील काश्‍मीर बाजारात दोन वेळा झालेली विक्री... महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी केलेल्या सुटकेनंतर सुधारगृहात झालेली रवानगी... शिकायची आवड असल्याने सुधारगृहाच्या अधीक्षकांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार... तब्बल 16 वर्षांनी पुस्तक हाती घेतल्यानंतर जिद्दीने अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण मिळविले.

देवनार येथील सुधारगृहात राहणाऱ्या रूपालीची (नाव बदललेले आहे) ही कहाणी. मूळच्या सांगलीच्या असलेल्या रूपालीने 2014 मध्ये घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन प्रेमविवाह केला; मात्र वर्षभरातच पतीने घराबाहेर काढल्यानंतर ती पुण्यात गेली. तेथे एका महिलेने नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत तिला आग्रा येथे नेऊन दीड लाख रुपयांना विकले. हे समजताच तिने केलेल्या आरडाओरड्यानंतर तिला विकत घेणाऱ्या महिला दलालाने सोडून दिले. आग्र्यासारख्या नवख्या शहरात विश्‍वास कोणावर ठेवायचा हे रूपालीला कळत नव्हते. कुणाकडे मदत मागितल्यास पुन्हा फसवले जाऊ, या भीतीतून तिने आग्र्यातील पदपथावर तीन दिवस उपाशीपोटी झोपून काढले. त्या वेळी रूपालीची विचारपूस करणाऱ्या महिलेने तिला खोटे सांगून दिल्लीत नेऊन तेथील काश्‍मीर बाजारात देहविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्यांच्या टोळीला तीन लाखांना विकले. त्यानंतर ती महिला पळून गेली.

रूपालीने विरोध दर्शवताच संबंधित व्यक्तींनी पैसे देईपर्यंत सुटका होणार नाही, असे सांगितले. गावात बदनामी करण्याची धमकीही त्यांनी दिली. 2016 मध्ये मुंबई पोलिसांच्या पथकाने रूपालीची दिल्लीहून सुटका केली. त्यानंतर तिला देवनार येथील नवजीवन सुधारगृहात ठेवण्यात आले. तेथे भूतकाळ विसरून रूपालीने नव्या आयुष्याला सुरवात केली. रूपालीला शिकण्याची आवड असल्याचे समजताच सुधारगृहाच्या अधीक्षक प्रतिभा ओव्हळ यांनी "यू कॅन क्री अप' या संस्थेच्या मदतीने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.

पुढील शिक्षणासाठी रूपालीची कागदपत्रे लागणार असल्याने त्या संस्थेच्या प्रतिनिधीने तिच्या वडिलांशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी कागदपत्रे दिली; मात्र रूपालीशी संबंध तोडून टाकले. त्यानंतर रूपालीने जिद्दीने अभ्यास सुरु केला. 16 वर्षांनंतर पुस्तक हाती घेतल्यावर तिला थोडे अवघडल्यासारखे झाले. संस्थेच्या शिक्षिकांनी इंग्रजी, विज्ञान, गणित विषयासाठी तिच्यावर विशेष मेहनत घेतली. या वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. त्यात रूपालीला 50 टक्के गुण मिळाले आहेत. शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तिचा निश्‍चय आहे.

विशेष पुनर्वसन केंद्रातील मुलींचे यश
चेंबूर येथील सरकारी विशेष पुनर्वसन केंद्रातील सहा मुली यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. या संस्थेतील मुली प्रथमच या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी काही जणी मुंबई, पश्‍चिम बंगाल, ओडिशाच्या आहेत. त्या सर्वांचे शिक्षण चौथी ते सहावीपर्यंत झाले होते. समुपदेशन करून त्यांच्यात पुढे शिकण्याची आवड निर्माण करण्यात आली. या मुलींना पर्यटन, बॅंकिंग, फॅशन डिझायनिंग आदी क्षेत्रांत काम करायचे आहे, अशी माहिती "सेव्ह द चिल्ड्रन' या संस्थेच्या वरिष्ठ अधिकारी वैभवी टेलर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbia news girl success in ssc exam