esakal | 'अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याबद्दल आव्हाडांवर कारवाई करा'; भाजप महिला मोर्चाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

'अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याबद्दल आव्हाडांवर कारवाई करा'; भाजप महिला मोर्चाची मागणी

कोरोना येणार हे अल्लाहला माहित होते, असे विधान करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे

'अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याबद्दल आव्हाडांवर कारवाई करा'; भाजप महिला मोर्चाची मागणी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई -  कोरोना येणार हे अल्लाहला माहित होते, असे विधान करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आव्हाड यांनी वरील आशयाचे विधान केले होते. कोरोना येणार हे अल्लाहला माहीत होते, म्हणूनच मुंब्र्याला 2019 मध्ये कब्रस्तान मिळाले, असे विधान त्यांनी केले होते. आव्हाड यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालतानाच भाविकांच्या धार्मिक भावनांना कुरवाळण्याचाही प्रयत्न केला आहे, अशी टीका श्रीमती देसाई यांनी केली आहे. 

कोरोना येणार हे अल्लाहला 2011 मध्येच माहिती होते, म्हणून मुंब्र्याला 2019 मध्ये कब्रस्तान मिळाले व 2020 मध्ये कोरोनाची साथ आली, असे धक्कादायक विधान आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची ध्वनीचित्रफीतही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. त्यासंदर्भात श्रीमती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे वरील मागणी केली आहे. हे विधान एका अर्थाने बालिश असले तरी ते धार्मिक बाबींशी संबंधित असल्याने त्याची दखल घ्यायलाच हवी, असेही देसाई यांनी म्हटले आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

ही बेफाट विधाने कोणत्या आधारावर केली हे मंत्रीमहोदयांनी स्पष्ट करावे. परमेश्वराला मधे आणले की लोकांचा आपल्यावरील रोष कमी होईल, असा त्यांचा समज असावा. मात्र असे विधान करून त्यांनी आपण स्वतः किती अंधश्रद्धाळू आहोत हे दाखवून दिले आहे. एरवी भाजपच्या कोणा हिंदू मंत्र्याने चुकूनजरी अंधश्रद्धेला उत्तेजन देणारे विधान केले असते तर कथित सेक्युलर डावी मंडळी त्याच्यावर तुटून पडली असती. पण इथे अशी विधाने करणारे मंत्रीमहोदय हे त्यांच्याच गटाचे असल्याने ही डावी मंडळी आता शांत आहेत, हे निषेधार्ह आहे, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे. 

आव्हाड यांचे हे विधान अत्यंत पोरकटपणाचे तर आहेच, पण मुंब्रावासियांच्या जखमेवर मीठ चोळणारेही आहे. मुंब्र्यासाठी फार उशिराने कब्रस्तान मिळाल्याच्या अपयशावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी आव्हाड यांनी हे बालिश विधान केले आहे. मात्र या बालबुद्धीच्या आव्हाड यांना मतदार येत्या निवडणुकीत जागा दाखवून देतील. त्यापूर्वी अंधश्रद्धांचे कथित निर्मूलन करण्याचा दावा करणाऱ्या संघटना जाग्या होतील का, असेही श्रीमती देसाई यांनी विचारले आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbra marathi political Take action superstition jitendra awhad BJP political marathi