पावसाळ्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज

पावसाळ्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : आगामी पावसाळ्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिका मुख्यालयात २४ तास कार्यरत असणारा आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शहरात कोणतीही आपत्ती ओढवल्यास नागरिकांनी या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर शहरातील सरासरी पर्जन्यमान २,४०० मिमी आहे. मिरा-भाईंदर शहराची भौगोलिक स्थिती अशी आहे की, शहर हे समुद्रसपाटीपासून काहीसे खाली आहे. त्यामुळे समुद्राला मोठी भरती आली व त्याच वेळी मुसळधार पाऊस पडला, तर शहरातील पावसाचे पाणी समुद्राला वाहून नेणारे सर्व मार्ग बंद होतात व शहरात पूरस्थिती निर्माण होते. शहरात जलभराव होण्याची ३० ठिकाणे आहेत. या ठिकाणी तुंबलेले पाणी काढण्यासाठी महापालिकेकडून शक्तिशाली पंप लावण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाने प्रत्येकी दोन फायबर आणि रबरी नौकांची, तसेच तीन तराफ्यांची तजवीज केली आहे. त्याचप्रमाणे बाधित नागरिकांसाठी महापालिकेच्या ३६ शाळा आणि ३१ खासगी शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे.

आपत्कालीन कक्षाचा क्रमांक
महापालिका मुख्यालयात २४ तास कार्यरत राहणारा आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षासाठी तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाला संपर्क साधण्यासाठी २८११७१०२ व २८११७१०४, तसेच ८६५७९४९७१५ व ८२९१३७०१३८ या क्रमांकावर, तसेच dm@mbmc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महापालिकेच्या सहा प्रभाग कार्यालयातही स्वतंत्रपणे आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यात कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेली वाहने, तसेच साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com