पुण्यातील तिहेरी हत्याकांड; मसाळकर याची फाशीची शिक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षांच्या निरागस मुलीसह पत्नीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजित मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली.

मुंबई - जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षांच्या निरागस मुलीसह पत्नीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजित मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली.

वानवडी पोलिस विभागाच्या हद्दीत राहणाऱ्या मसाळकरने (वय 29) ऑक्‍टोबर 2012 मध्ये आईचा, पत्नीचा आणि मुलीचा निर्घृणपणे खून केला होता. त्याचे त्याच्या कार्यालयातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्याने हत्येचे कटकारस्थान केल्याचा आरोप अभियोग पक्षाने ठेवला आहे. पुणे सत्र न्यायालयाने 2013 मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती कायम करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात याचिका केली होती, तर आरोपीनेही शिक्षेविरोधात अपील केले होते. न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी याचिकांवर 68 पानी निकालपत्र जाहीर केले.

आरोपीने आपली आई अर्चनाला आणि दोन वर्षांची मुलगी किमयाला ज्या थंड डोक्‍याने ठार केले आहे ते पाहता त्याच्यामध्ये भविष्यात कोणतीही सुधारणा होईल, असे वाटत नाही. आरोपीची फाशी रद्द करण्यासाठी किमान तो त्यासाठी लायक असावा लागतो. मात्र, मसाळकर पुन्हा समाजात जाऊन चांगले वर्तन करू शकेल, असे त्याच्या कृत्यावरून वाटत नाही. त्यामुळे तो कोणत्याही दयेला पात्र नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

आरोपीने बचावामध्ये केलेल्या युक्तिवादात सांगितले होते, की पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात दावा केला होता. त्यामुळे हत्या करण्याचे कारण नव्हते, असा दावा आरोपीच्या वतीने केला होता. मात्र, अभियोग पक्षाने तो दावा फेटाळला होता. घरामध्ये झालेल्या सामानांच्या तोडफोडीवरून त्याने चोरीचा बनाव केला असला, तरी सीसीटीव्ही व अन्य पुराव्यांवरून त्याने हत्या केल्याचे उघड होते, असे अभियोग पक्षाच्या वतीने वकील अराफत सैत यांनी मांडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Case Crime Hanging Punishment High Court