उधारीवर सिगारेट न दिल्याने पानटपरीवाल्याची हत्या; सराईतांना पोलिसांकडून अटक

अनिश पाटील
Friday, 11 December 2020

वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात केवळ एका सिगारेटसाठी दोन सराईत गुन्हेगारांनी पानटपरी चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे.

मुंबई - वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात केवळ एका सिगारेटसाठी दोन सराईत गुन्हेगारांनी पानटपरी चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाना अटक केली असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुदस्सिर खान(25) असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसानी समीर रफीक हुसेन खान आणि शेहजाद ऊर्फ अब्दुल सत्तार शेख यांना अटक केली आहे. वांद्रे पूर्वेकडील नौपाडा परिसरात मुदस्सिर खान याची पानटपरी आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर आणि शेहजात हे दोघे तरुण या ठिकाणी आले. नशेसाठी चोरी, पाकिटमारी करणा-या दोघांनी मुदस्सिर याच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. आधीची उधारी असल्याने आणि सकाळची वेळ असल्यामुळे मुदस्सिर याने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोघांनी चाकूने मुदस्सिर याच्यावर वार केले.

जे.पी. नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राम कदमांकडून निषेध, घाटकोपरमध्ये मोर्चा

 नशेत असल्याने दोघे एवढ्या जोरजोरात चाकू मारत होते की, बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेला मुदस्सिर याचा भाऊ आणि आईदेखील या हल्ल्यात जखमी झाले. रक्तस्त्राव झाल्याने मुदस्सिर याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. निर्मल नगर पोलिसांनी समीर आणि शेहजाद दोघांना अटक केली असून, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणातील समीर विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. समीरवर दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच शेहजादविरोधातही दोन गुन्हे दाखल आहेत.

The murder of Pantpariwala for a cigarette 

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of Pantpariwala for a cigarette