
संभाजीराजेंचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना? - दरेकर
मुंबई : राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chatrapati) यांच्या उमेदवारीवरुन सध्या राज्यात बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. यामध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकारवर (MVA Govt) टीका केली आहे. मविआकडून संभाजीराजे छत्रपती यांचा गेम करण्याचा प्रयत्न तर होत नाहीए ना? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला असल्याचं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटलं आहे. (MVA is trying to play Sambhaji Chhatrapati isnt it says Pravin Darekar)
हेही वाचा: निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टावर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप
दरेकर म्हणाले, "राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत मविआ सरकारची भूमिका एकाने मारल्यासारखं कर आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं कर अशी दिसते. पवार साहेबांनी आधी पाठींबा जाहीर केला पण त्यांनी सर्वांचं मत घेऊन पाठिंबा जाहीर केला का? कारण संजय राउतांनी शिवसेनेनं दुसरा उमेदवार उभा करणार असं विधान केलं. उद्धव ठाकरेंनी संभाजी राजेंना शिवसेनेचा झेंडा घ्या, प्रचार करा अशा अटी घातल्या. पण यावरुन संभाजीराजेंचा गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्याना वाटतो. मागील 6 वर्षे त्यांना भाजपने सन्मानाने खासदारकी दिली, त्यांना आम्ही कधीही अटी घातल्या नव्हत्या. ते छत्रपतींचे वारस आहेत त्यामुळे त्यांना अटी चौकटीत बसवणे योग्य नाही"
नाना पटोलेंना जनता आणि काँग्रेसही गांभीर्यानं घेत नाही
सामनातील लेखावरुन दरेकारंनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, काँग्रेसला भोकं पडली म्हणतात आणि त्याच काँग्रेसची घागर यांना लागते. सत्तेसाठी यांची दुटप्पी भूमिका दिसते. त्यांची भोकं बघण्यापेक्षा आपली काय अवस्था होते याकडं त्यांनी बघावं? आपण राजकीयदृष्ट्या कोरडे होते याचं भान ठेवावं. ज्यांच्यावर टीका होत आहे ते देखील सत्तेसाठी लाचार होत आहेत. नाना पटोलेंचं म्हणणं जनता आणि त्यांचा पक्ष देखील गांभीर्यानं घेत नाही. फक्त टीका करायची आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था नानांची आहे. कुठलेही कठोर पाऊल उचलायचं धाडस पटोलेंमध्ये नाही.
मलिकांबाबत कोर्टाच्या निर्णयावरुन मविआवर हल्ला
नवाब मलिकांचे अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पुराव्यासह सांगितले. त्यावेळी आम्ही राजकीय दृष्टीने आरोप करतो असं सर्वांना वाटत होतं पण आज कोर्टानंही ते सांगितलं. उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे ज्यांचे दाऊदशी सबंध आहेत त्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांचा अहंकार मोठा आहे? भाजप मागणी करतंय म्हणून काढायचं नाही, असं त्यांनी ठरवलंय. त्यांना फक्त सत्ता टिकवायची आहे, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी टीका केली.
Web Title: Mva Is Trying To Play Sambhaji Chhatrapati Isnt It Says Pravin Darekar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..