22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचे गूढ कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जवळपास 15 दिवस उलटूनही अद्याप या मृत तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आवाहन करूनही कुणीही तरुणीची ओळख पटवण्यासाठी पुढे न आल्याने या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. 

ठाणे : 1 जानेवारी रोजी रात्री तीनहात नाका येथील पादचारी पुलावरून (स्कायवॉक) उडी घेऊन आत्महत्या केलेली 22 वर्षीय तरुणी अद्याप बेवारस आहे. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वागळे इस्टेट पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. मात्र, जवळपास 15 दिवस उलटूनही अद्याप या मृत तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आवाहन करूनही कुणीही तरुणीची ओळख पटवण्यासाठी पुढे न आल्याने या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. 

ही बातमी वाचा- मुंबई-ठाणे प्रवास आणखी वेगवान
ठाणे पश्‍चिमेकडील तीनहात नाक्‍यानजीकच्या एलबीएस रोडवरील रहेजा गृहसंकुल येथील पादचारी पुलावरून उडी मारून एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना 1 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या जखमी तरुणीला उपचारासाठी आधी सिव्हिल रुग्णालय आणि नंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, कळवा रुग्णालयात तिच्यावर तातडीने उपचार होऊ न शकल्याने अखेर तिचा मृत्यू ओढवला होता. दरम्यान, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता.

यासाठी पोलिसांनी ठाणे व मुंबईसह आसपासच्या परिसरातील सर्व पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रारीचा शोध घेतला होता. मात्र 20 ते 22 वर्षीय तरुणीच्या बेपत्ता असण्याची एकही तक्रार आढळली नव्हती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक आणि सुरक्षा रक्षकाच्या जबाबातून काहीच माहिती मिळाली नाही. दोघांनीही सदर तरुणी बराच वेळ या रस्त्यावर घुटमळत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे तरुणीने आत्महत्या केली की कुणी तिच्यासोबत घातपात केला, याबाबत तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. तिच्या शवविच्छेदन अहवालांमधूनदेखील विशेष काही निष्पन्न झाले नसून अद्याप कुणीही नातेवाईक पोलिसांना संपर्क करीत नसल्याने तरुणी परराज्यांतील तर नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तेव्हा पोलिसांनी या मृत तरुणीच्या वारसांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले असून तिची ओळख पटविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तोवर या तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहे. 

पोलिसांचे नागरिकांना आवाहन 
ठाण्यातील पादचारी पुलावरून गूढरित्या आत्महत्या केलेल्या तरुणीची ओळख न पटल्याने ठाणे पोलिसांसमोर हे मोठे आव्हान ठरले आहे. तिच्याजवळ कोणतेही ओळखीचे दस्तऐवज आढळले नव्हते. शिवाय मृतदेहावर कुठल्याही जन्मखुणा आढळून न आल्याने पोलिसांच्या शोधकार्यात अडथळे आले आहेत. तरी कुणाला या तरुणीबाबत माहिती अथवा तिच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांची माहिती मिळाल्यास वागळे इस्टेट पोलिस ठाणे - 022 25805252 येथे संपर्क साधावा, असे आवाहन वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. एस. पठाण यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mystery of the young girl committed suicide in Thane