Special Report | नाचणी पीक हद्दपार? परिसरातून नाचणीचे पीक शेतातून गायब होऊ लागले

Special Report | नाचणी पीक हद्दपार? परिसरातून नाचणीचे पीक शेतातून गायब होऊ लागले

रसायनी  : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास ओळखले जाणारे नाचणीचे पीक रसायनी परिसरातील शेतातून गायब होऊ लागले आहे. येथील औद्योगिकीकरणामुळे परिसरातील नागरिकांना नोकरी आणि इतर व्यवसाय उपलब्ध झाले आहे. बाजारात अन्य भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक घेणे बंद केले आहे. परिणामी, नाचणीचे पीक हद्दपार होऊ लागले आहे. आता खेडेगावात बहुतेक शेतकऱ्यांकडे नाचणी विकतही मिळत नाही. 

महाराष्ट्रामध्ये नाचणीचे उत्पादन कोकणात आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात तृण धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरीसारखे नाचणीला फारसे महत्त्व नाही. लहान मुलांसह मोठे बाजारीच्या भाकरी खाण्यास नाक मुरडतात. पूर्वी शेतकरी खरिपाच्या हंगामात भात पिकाबरोबर वरकस जमिनीत नाचणी, वरी, तीळ, उडीद, हुलगा, रताळी आदी पीक घेत होते. कालांतराने कारखानदारी आली आणि परिस्थिती बदलत गेली. यामुळे इतर शहरांना गाव जोडले गेले. स्थानिकांना रोजंदारीची कामे आणि व्यवसाय मिळाले. त्याचबरोबर कामधंद्यामुळे इतर ठिकाणचे लोक गावागावांत आले. गावात सर्व प्रकारच्या वस्तू विकत मिळू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरी, हुलगा आदी पीक घेणे बंद केले. मात्र, खरिपाच्या हंगामात भात आणि नाचणीचे पीक सुरू होते. 

दरम्यान, मागील आठ ते 10 वर्षांत भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामात भातपिकाबरोबर इतर पीक घेणे बंद केले. सद्यस्थितीत सिंचनाचा आधार असलेले शेतकरी 12 महिने भाजीपाल्याचे पीक घेत आहे. हळूहळू नाचणीचा खाण्यात वापर कमी होऊ लागला आहे. परिणामी, बाजारात मागणी कमी होत गेली. पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक बंद केले. 

गुणकारी नाचणी 
नाचणीची भाकर पचनासाठी हलकी म्हणून ओळखली जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे मुबलक आहेत. नाचणीत कॅल्शियमचे सर्वांत जास्त प्रमाण असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी ती उपयुक्त आहे. लेसिथिन आणि मिथीओनाईन या ऍमिनो आम्लामुळे पित्त कमी करण्यासाठी आणि यकृतामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. नाचणीमधील घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मुधमेह रुग्णांना नाचणीची भाकर खाण्याचा सल्ला डॉक्‍टर आवर्जून देतात. 

नाचणीची भाकर पचनासाठी हलकी असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. मागील वर्षी सुरुवातीचे पाच ते सहा महिने वासांबे मोहोपाडा येथील सर्व दुकानांत आणि परिसरात खेडेगावात चौकशी केली. मात्र, नाचणी मिळत नव्हती, आताही मोजक्‍या दुकानात मिळत आहे. 
- सुजाता पाटील,
वासांबे मोहोपाडा 

पूर्वी भात आणि नाचणीचे पीक घेत होते. हळूहळू नाचणीचा वापर कमी होत गेला. त्यामुळे मागणीत घट होत गेली. परिणामी, आता नाचणीचे पीक घेतले जात नाही. त्यातच वासांबे मोहोपाडा, पनवेल बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगली मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे बहुतेक जण पावसाळी आणि सिंचनाचा आधार घेत 12 महिने भाजीपाला पिकवतात. 
- पांडुरंग दरवडा,
आदिवासीवाडी 

पूर्वीपासून शेतकरी खरिपाच्या हंगामात भातपिकाबरोबर वरकस जमिनीत नाचणी, वरी, तीळ, उडीद, हुलगा, रताळी आदी पीक घेत होते. कारखानदारी आली परिस्थिती बदली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी वरी आणि इतर पीक घेणे बंद केले. आता नाचणीचे पीक घेणे बंद केले आहे. अगदी थोड्या प्रमाणात आदिवासीवाडीतील ठाकर बांधव नाचणीचे पीक घेत आहेत. 
- सुदाम कडपे,
कृषीमित्र, वासांबे मोहोपाडा

Nachani crop decreases The crop from the raigad began to disappear from the fields

------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com