'दिशा'बाबतचं वक्तव्य भोवलं! गुन्हा रद्द करण्यासाठी राणे पितापुत्रांची हायकोर्टात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case

'दिशा'बाबतचं वक्तव्य भोवलं! गुन्हा रद्द करण्यासाठी राणेंची हायकोर्टात धाव

मुंबई : दिशा सालियनबाबत केलेल्या विधानांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Narayan Rane)

पोलिसांनी आमच्याविरोधात राजकीय शत्रुत्व ठेवून गुन्हा नोंदवला आहे. आम्ही सरकारविरोधात मत व्यक्त करतो, त्यामुळे केवळ आमचा आवाज बंद करण्यासाठी हा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, असे राणे यांनी याचिकेत म्हटले आहे. १९ फेब्रुवारीला एका पत्रकार परिषदेत राणे यांनी दिशाच्या मृत्यूबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी नीतेश राणेदेखील उपस्थित होते. दिशाच्या आईने या आक्षेपार्ह विधानांबाबत गुन्हा नोंदवला होता.

जामिनाला विरोध

राणे पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांच्या वतीने आज दिंडोशी न्यायालयात विरोध करण्यात आला. दिशाच्या मृत्यूबाबत असलेल्या पुराव्यांची माहिती पोलिस चौकशीमध्ये देण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर हत्याचा झाल्याचा आरोप करताना आक्षेपार्ह आरोप राणेंनी केले होते. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महिला आयोगानं पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.