''मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा'', भाजप आक्रमक

''मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा'', भाजप आक्रमक

मुंबईः  गृहरक्षक दलाचे कमांडर जनरल परम बीर सिंह यांच्या एका लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे. परम बीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यानं गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर भाजपही आक्रमक झाली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटरबॉम्ब प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे. मात्र या प्रकरणात झालेल्या आरोपानं राज्याची बदनामी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे. आज पुन्हा एकदा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

नारायण राणे पुढे म्हणाले की, सचिन वाझेंना पोलिस खात्यात आम्ही आणलं नसल्याचं वक्तव्य अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांनी केलं. म्हणजेच वाझेंना पोलिस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणलं असल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं असून वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते, असा थेट आरोप राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. 

मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पापही वाझेंनीच केलं आहे. वाझे संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवालही राणेंनी केला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी राणेंनी केली आहे. 

महाराष्ट्रात पैसे द्या आणि मुडदे पाडा असा कारभार सध्या सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाझेंची चौकशी केली जात आहे. आता गृहमंत्र्यांचीही चौकशी होईल. राज्याला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे. असा बेजबाबदार मुख्यमंत्री यापूर्वी झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकक्षणही खुर्चीवर राहू नये, असं नारायण राणे आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.  तसंच परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना आधी कळवलं होतं. मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही नारायण राणेंनी केला आहे. 

Narayan rane Press conference demand cm uddhav thackeray resign

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com