esakal | नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचे दलाल - संजय निरुपम 
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचे दलाल - संजय निरुपम 

नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचे दलाल - संजय निरुपम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून घोटाळ्यांमध्ये भागीदार आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींसाठी दलालीचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अनिल अंबानींचे दलाल आहेत, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत केली. मुंबई कॉंग्रेसतर्फे राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस ते बोलत होते. 

अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमान कराराच्या दहा दिवस अगोदर मान्यता मिळाली. ज्या कंपनीला विमानाचा नट बोल्ट बनवायचादेखील अनुभव नाही, त्या कंपनीला नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राफेल विमान खरेदी व्यवहार करण्याचे काम दिले. 12 डिसेंबर 2012 रोजी कॉंग्रेस सरकारच्या काळात डिसॉल्ट एव्हिएशनने जाहीर केलेल्या राफेल विमानांच्या बोलीदरम्यान राफेल विमानांची किंमत प्रत्येकी 526.10 कोटी रुपये म्हणजेच 36 विमानांची किंमत 18,940 कोटी रुपये ठरवण्यात आली होती. पण मोदी सरकारने हीच विमाने प्रत्येकी 1670.70 कोटी या दराने म्हणजेच 36 विमाने 60,145 कोटी रुपयांना खरेदी केली. भाजप सरकारच्या 2016 च्या वार्षिक अहवालामध्ये ही किंमत नमूद केलेली आहे. जास्त दिलेले 41,205 कोटी रुपये हे भारतीय जनतेच्या खिशातून गेलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षामंत्री निर्मला सीतारामन या कराराविषयी सर्व माहिती लपवून ठेवत आहेत. यावरून या करारामध्ये घोटाळा झालेला आहे हे स्पष्ट होते, अशी माहिती निरुपम यांनी दिली. या मोर्चामध्ये निरुपम यांच्यासोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, आमदार अस्लम शेख, मुंबई महिला कॉंग्रेस अध्यक्षा अजंता यादव, कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

निरुपम म्हणाले, की संसदेमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना राफेल विमान खरेदीविषयी माहिती सांगण्याची मागणी केली; परंतु मोदी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगून माहिती लपवत आहेत. या घोटाळ्याची संपूर्ण माहिती जनतेला कळण्यासाठी कॉंग्रेसतर्फे मुंबईतील प्रत्येक विभागात असेच मोर्चे काढण्यात येणार आहेत, असेही निरुपम म्हणाले. 

loading image
go to top