पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये

कल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ( ता. 18) कल्याणमध्ये येणार आहेत. सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी ते येणार आहे. या दोन्ही प्राधिकरणांवर भाजपचे वर्चस्व असल्याने याचा फायदा घेत भाजप मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो हा प्रकल्प एमएमआरडीए; तर सिडकोच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या 90 हजार घरांचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्याला शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी उपस्थित राहणार की नाही, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत; परंतु हा सरकारी कार्यक्रम असल्याने कोणत्या पक्षाला निमंत्रण देण्याचा विषयच येत नसल्याचे सांगत भाजपमधील वरिष्ठांनी हात वर केले आहेत. त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत कल्याण येथेच व्यासपीठावरून युतीचा नारा देणारी शिवसेना या सोहळ्यास उपस्थित राहून मैत्रीचा हात पुढे करते की पाठ दाखवते, हे पाहावे लागेल. 

काय बोलले होते मोदी? 
गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी महायुतीच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये आले होते. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात गांधी घराणे आणि कॉंग्रेसच्या कारभारावर सडकून टीका करण्यास अधिक प्राधान्य दिले होते. आता तीन राज्यात कमळ कोमेजले असून हाताने कमाल केली आहे. त्यामुळे येत्या सोहळ्यास ते कोणत्या पक्षावर काय टीका करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. परदेशातील काळा पैसा पुन्हा देशात आणला पाहिजे, असेही त्यांनी कल्याणमध्ये निक्षून सांगितले होते. 

मेट्रो प्रकल्पाची डेडलाईन हुकणार 
ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो मार्ग क्र. 5 प्रकल्पासाठी एमएमआरडीएने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 8,416 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. ऑक्‍टोबर 2016 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र 2018 साल सरत आले, तरी याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. भूमिपूजन सोहळा झाला तरी त्यानंतर आचारसंहिता, निवडणुका या बाबी लक्षात घेतल्या तर हे काम लांबणीवर पडणार हे नक्की. 

प्रतिक्रिया : हा सोहळा सरकारी असून यात कोणत्याही पक्षाला भाजपने निमंत्रण देण्याचा विषय येत नाही. मात्र कार्यक्रमात शिष्टाचार पाळला जाईल. 
- नरेंद्र पवार, आमदार, भाजप 

सोहळ्याला जायचे की नाही याबाबत कोणातही निर्णय झाला नाही. पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते आदेश पाळले जातील. 
- सुभाष भोईर, आमदार, शिवसेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com