'नागझिरा'तील निसर्ग चित्रे झळकणार आता डेक्कन क्वीनवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्या शुभारंभ

- बोधलकसा पर्यटक निवासाची माहितीही होणार प्रसारित

मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत. उद्या (शनिवार) सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून, ते हिरवा झेंडा दाखवून या सुशोभित एक्सप्रेसला रवाना करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारत आहे.

फाशी, नराधमच्या चर्चेत दुर्दैवाने हा मुद्दा बाजूलाच

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, या एक्सप्रेसच्या बाह्य भागावर ही निसर्गचित्रे लावून नागझिरा अभयारण्य व बोधलकसा पर्यटक निवासाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून, तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार आहेत.

काळे म्हणाले, की महाराष्ट्रात पर्यटन‍ विकास महामंडळाची (एमटीडीसी) विविध ठिकाणी 23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय आहे व सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे.

अभयारण्याच्या परीसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांचा वावर असतो. परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते. आता या परिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

तसेच या माध्यमातून पर्यटकांना नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nature Pictures of Nagzira zoo will appeares on Deccan Queen