
Navi Mumbai: नवी मुंबईतील जुन्या मंदिरांच्या संपादित केलेल्या जमिनींच्या बदल्यात १२.५ टक्के योजना लागू करण्याच्या हालचाली सिडको महामंडळाने सुरू केल्या आहेत. देवांच्या नावावरील जमीन असलेल्या पारगाव, कामोठे आणि उरण येथील शेतकऱ्यांना १२.५ आणि २२.५ टक्के योजनेला लाभ मिळण्यासाठी पात्रता मंजूर करण्याचे आदेश राज्य सरकारने सिडको महामंडळाला दिले.
त्यानुसार सिडकोने पावले उचलली असून सिडकोच्या येत्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे; मात्र कुळांच्या नावाने निघणारे हे भूखंड नक्की कोणाच्या घशात जातील, याबाबत शंका व्यक्त होत आहे. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता कोणी प्रतिसाद दिला नाही.